![]()
करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळी उत्पादन, आधुनिक पॅकिंग आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यातीची यशस्वी साखळी अभ्यासण्यासाठी कर्नाटक राज्याचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. कर्नाटकाचे फलोत्पादन सचिव आर. गिरीश यांच्या अध्यक्षतेखालील या पथकाने कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी किरण डोके यांच्या केळी निर्यात केंद्राला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतातील उच्च दर्जाच्या केळी उत्पादनापासून ते थेट निर्यातीपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली. करमाळ्याच्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या या ‘एक्सपोर्ट मॉडेल’चे कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. आशियाई विकास बँक पुरस्कृत मंगनेट प्रकल्पांतर्गत दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. मंगनेट प्रकल्पाची अंमलबजावणी, विविध घटक, तांत्रिक साहाय्य (टीए), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) यांची कार्यपद्धती आणि मंगनेट २.० च्या आराखड्याबाबत माहिती घेणे व दोन्ही राज्यांमधील अनुभवांची देवाणघेवाण करणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिष्टमंडळाने किरण डोके यांच्या केंद्रावर केळीच्या वाण निवडीपासून, काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग आणि शीत साखळी द्वारे निर्यात होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. के.डी. एक्सपोर्टच्या वतीने पाहुण्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले. सामान्य शेतकरी कुटुंबातून येत किरण डोके यांनी उभ्या केलेल्या निर्यातीच्या मॉडेलचे सचिव गिरीश यांनी विशेष कौतुक केले. या पाहणी दौऱ्यावेळी कर्नाटकचे फलोत्पादन संचालक इब्राहिम मैगूर, अतिरिक्त संचालक डॉ. प्रकाश एम. सोबाराड, कार्यकारी संचालक सोमशेखर एस. हुल्लोळी, सहसंचालक मंजुनाथ नारायणपूर, नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ राघवेंद्र, सल्लागार मेघा पांडे, महाराष्ट्र मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक शिरीष कुलकर्णी, विभागीय उपसंचालक नितीन पाटील, विभागीय प्रकल्प उपसंचालक मंगेश कदम, सचिन माने यांच्यासह अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
करमाळ्यातील केळी एक्सपोर्ट मॉडेलची कर्नाटकलाही भुरळ:कंदर येथील एक्सपोर्ट व्यवस्थापनाची पाहणी