![]()
पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंगलसूर, तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या… अशा भक्तिमय वातावरणात घोडेगावहून श्रीक्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र पलंगाचे बेल्हे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी संपूर्ण बेल्हे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. नवरात्रोत्सवात तुळजापूरच्या मंदिरात देवीची मूर्ती ज्या पलंगावर विराजमान होते, त्या पलंगाचा घोडेगाव ते तुळजापूर असा तब्बल ५५ दिवसांचा पारंपरिक प्रवास सुरू आहे. या प्रवासात विविध नदीपात्रांतून पलंग पैलतीरी नेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही भाविक श्रद्धेने जपत आहेत. पलंग बेल्ह्यात दाखल होताच बसस्थानकासमोर सामुदायिक महाआरती करण्यात आली. त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत पलंगाचे दर्शन घेतले. यावेळी महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विलास अटक व संतोष गुळवे यांच्या वाघ्या-मुरळी पार्टीचा कार्यक्रमही रंगला. मिरवणुकीनंतर पलंग अंबिका माता मंदिर सभागृहात विश्रांतीसाठी विसावला. पाबळे परिवाराने भाविकांसाठी मिष्टान्नाची व्यवस्था केली. त्यानंतर बोऱ्हाडे कुटुंबीयांनी पलंग पुढील मुक्कामासाठी अळकुटीकडे नेला. दरम्यान, कुमशेतहून हापूसबागकडे जाताना पलंग कुकडी नदीपात्रातून पैलतीरी नेण्यात आला. पाण्याचा प्रवाह, दगडधोंडे व घसरणाऱ्या मार्गांवरून भाविकांनी हा टप्पा पूर्ण केला. पुणे, अहिल्यानगर, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतून हा प्रवास होतो. मेहकर नदीपात्र सात वेळा, तसेच आष्टीतील तलवार नदी आणि बार्शीजवळील बेडका नदीपात्रही या यात्रेच्या मार्गावर येतात. बाराव्या शतकापासून परंपरा अखंड सुरू उपलब्ध संदर्भानुसार तुळजाभवानीच्या पलंगाचा हा प्रवास बाराव्या शतकापासून सुरू असल्याचे नमूद केले जाते. रस्ते व पूल निर्माण झाले तरी नदीपात्रातून पलंग पैलतीरी नेण्याची श्रद्धा आजही कायम आहे. पाणी किंवा पूरस्थिती असल्यास सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जातो; मात्र परिस्थिती अनुकूल असताना पारंपरिक वाटचाल जपली जाते.
Source link
फुलांच्या पायघड्यांनी तुळजाभवानीच्या पलंगाचे बेल्ह्यात स्वागत:नदीपात्रातून पलंग नेण्याची परंपरा आजही कायम