“केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणा
.
आज कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंचा महामोर्चा, अभिनेता डिनो मोरियाची चौकशी, दिशा सालियान प्रकरण आणि मिठी नदी घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “दिशा सालियान आणि मिठी नदी घोटाळ्याचा फास आवळत चालल्यामुळे अटकेच्या भीतीने आदित्य ठाकरे कधीही परदेशात पळून जाऊ शकतात. त्यामुळे शासनाने त्यांचा पासपोर्ट तात्काळ जप्त करून त्यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करावी,” अशी खळबळजनक मागणीही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाचा केवळ बुरखा; आतून उमर खलिदचे समर्थन!
शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या (CJP) आंदोलनाचा आणि ठाकरे बंधूंच्या महामोर्चाचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, “काल शिवाजी पार्कवर निवडणूक आयोगाच्या नावाने आंदोलन पुकारण्यात आले; पण प्रत्यक्षात तिथे देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या देशद्रोही उमर खलिदच्या समर्थनाचे पोस्टर्स झळकावले गेले. जणू काही तो कोणी मोठा स्वातंत्र्यसैनिक आहे, अशा थाटात हे बॅनर घेऊन फिरत होते.”
“ज्या व्यासपीठावर शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि विशाल ददलानीसारखे ‘तुकडे-तुकडे गँग’चे ब्रँड ॲम्बेसेडर एकत्र येऊन मिठी मारत होते, तिथे ‘सर तन से जुदा’ची भाषा करणाऱ्यांचे उघड समर्थन सुरू होते. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवाजी पार्कवरून कडवट हिंदुत्वाची गर्जना केली, त्याच मैदानात आता जिहाद्यांच्या समोर लोटांगण घालण्याचे काम ठाकरे बंधू करत आहेत.”
“उमर खलिदच्या समोर वाकणाऱ्यांनी स्वतःच्या नावातून ‘ठाकरे’ हे नाव काढून टाकावे आणि ‘वाकडे’ असे नाव लावावे. बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले असून आता यांचे कर्तृत्वही संपले आहे. अशा देशविरोधी मोर्चाला जनता कधीही माफ करणार नाही.”
मतदार यादीत घोळ होता, मग आदित्य ठाकरेंची वरळीतील जागा वैध कशी?
मतदार यादीतील कथित फेरफार आणि ईव्हीएमच्या आरोपांवरून त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. “जर मतदार यादीत घोळ आहे आणि निवडणूक आयोग चुकीचा आहे, तर मग दादरमध्ये अमित ठाकरेंचा पराभव करून निवडून आलेले उबाठाचे आमदार महेश सावंत यांच्या निवडणुकीवर मनसे किंवा ठाकरे आक्षेप का घेत नाहीत? वरळीत आदित्य ठाकरे कसे निवडून आले? बारामतीमध्ये सुप्रिया सुळे कशा निवडून आल्या? तेव्हा मतदार यादीत घोळ नव्हता का?”
“मतदार यादी पडताळणीच्या (SIR) माध्यमातून बोगस मतदार, रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींची नावे वगळली जात आहेत. मग त्यांना मतदार यादीत कायम ठेवून २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याच्या मनसुब्यांना खतपाणी घालायचे आहे का? व्होट जिहादच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांनाच निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेची पोटदुखी झाली आहे.”
डिनो मोरियाच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पळ काढण्याची तयारी
मिठी नदी घोटाळा आणि दिशा सालियान प्रकरणातील तपासावर भाष्य करताना राणे म्हणाले, “मिठी नदी घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सखोल चौकशी सुरू झाली आहे. हा डिनो मोरिया मुंबईतील कुख्यात नाईटलाईफ गँगचा सदस्य आहे आणि त्याचे थेट संबंध आदित्य ठाकरेंशी आहेत. ठाकरे सरकारच्या काळात याला कंत्राटे खिरापतीसारखी वाटली गेली.”
देश सोडून पळून जाण्याची शक्यता
“दिशा सालियान प्रकरणाच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियाचा उल्लेख आहे. आता जसजशी चौकशीची चक्रे वेगाने फिरत आहेत, तसतशी अटकेची टांगती तलवार आदित्य ठाकरेंवर आली आहे. माझ्याकडे पक्की माहिती आहे की त्यांच्या विमानाची तिकिटे बुक झालेली असून ते कधीही देश सोडून पळून जाऊ शकतात. त्यामुळे गृहविभागाने त्यांचा पासपोर्ट तत्काळ जप्त करावा.”
एमपीएससी परीक्षा आणि सरसंघचालकांच्या विधानावर प्रतिक्रिया
एमपीएससीच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष समिती नेमली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. विरोधकांनी केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये.”
मोहन भागवत यांच्या विधानाचे समर्थन करताना ते म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे की धर्म संकटात आला तर देश संकटात येईल. सनातन हिंदू धर्म हा जगाला शांती आणि सुरक्षा देणारा धर्म आहे. हिंदू धर्म जितका मजबूत होईल, तितकाच हा देश बलशाली होईल, या विधानाशी मी 100 टक्के सहमत आहे.”
वैमानिक स्मित म्हात्रेचे कौतुक
विमानाचे अपहरण रोखणाऱ्या आणि 160 प्रवाशांचे प्राण वाचवताना ‘हनुमान चालिसा’चे स्मरण करणाऱ्या धाडसी वैमानिक स्मित म्हात्रे यांचे राणे यांनी विशेष अभिनंदन केले. मात्र, संपूर्ण जगाने कौतुक करूनही राहुल गांधींनी स्मित म्हात्रेचे अभिनंदन का केले नाही, असा सवाल त्यांनी शेवटी विचारला.
————————————
हेही वाचा…
पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे:आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत

१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या राजकारणासह आगामी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत सविस्तर माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी