![]()
हैदराबादमधील आर्मी फॅसिलिटीमधून शस्त्रे चोरी केल्याप्रकरणी शनिवारी 3 लष्करी कर्मचाऱ्यांसह 7 जणांना अटक करण्यात आली. ही माहिती मल्काजगिरीचे पोलिस आयुक्त बी. सुमती यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील माजी हवालदार उप्पुथल्ला मल्लेश आहे. त्याला 11 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 30 आणि 31 ऑगस्टच्या मध्यरात्री बोलारम येथील कोटे आणि बटालियन मॅगझिनमधून AK-203 असॉल्ट रायफल्स आणि गोळ्या चोरल्याचा आरोप मल्लेशवर आहे. चोरीचा माल नागरकुर्नूलमधील अचामेपेट येथे त्याच्या वडिलांच्या घरात लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की चोरीचा संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे. तपासात कोणत्याही दहशतवादी किंवा उग्रवादी संघटनेशी संबंध आढळून आलेला नाही. शनिवारी 7 जणांना अटक तपासादरम्यान पोलिसांनी शनिवारी आणखी 7 जणांना अटक केली. यामध्ये सेवेत असलेले 3 लष्करी जवान, पश्चिम बंगालमधील 2 जण, मुख्य आरोपी मल्लेशचा एक चुलत भाऊ आणि त्याचा एक मित्र यांचा समावेश आहे. मल्लेशने ही इतर आरोपींच्या मदतीने ही घटना घडवून आणली होती. पोलिसांच्या मते, मोठी रक्कम जमवण्यासाठी चोरी आणि दरोड्याच्या घटना घडवणे हा त्याचा उद्देश होता. बी. सुमती यांनी सांगितले, “तपासानुसार, मल्लेशने इतर आरोपींच्या मदतीने शस्त्रे चोरली. मोठ्या संपत्तीशी संबंधित गुन्हे करणे हा त्याचा उद्देश होता. कोणत्याही दहशतवादी किंवा अतिरेकी संघटनेशी त्याचा संबंध आढळलेला नाही.” शिस्तभंगामुळे वेळेआधीच निवृत्त करण्यात आले मल्लेश २० बटालियन, मद्रास रेजिमेंटमध्ये हवालदार होता. शिस्तभंग आणि प्रकृती खालावल्यामुळे याच वर्षी जूनमध्ये त्याला वेळेआधीच निवृत्त करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात मल्लेश यापूर्वी घरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या आपल्या चुलत भावासोबत आणि मित्रासोबत मिळून त्याने मोठ्या दरोड्याचा कट रचला होता. बँका, दागिन्यांची दुकाने आणि श्रीमंत लोकांना लुटून अधिक पैसे कमावण्याची तिघांची इच्छा होती. लष्करी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कुलपे तोडली आयुक्तांनी सांगितले की, मल्लेशने आपल्या रेजिमेंटमधील 3 लष्करी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने त्याने कोठार आणि मॅगझिनची कुलपे तोडून शस्त्रे व गोळ्या चोरल्या. पोलिसांच्या चौकशीत मल्लेशने आणखी एक बाब कबूल केली. त्याने सांगितले की, 2022 मध्ये त्याची बटालियन कोलकात्यातील बराकपूर येथे तैनात होती. त्या काळात त्याने पश्चिम बंगालमधील 2 व्यक्तींकडून एक देशी बनावटीचे शस्त्र आणि एक जिवंत काडतूस खरेदी केले होते. पोलिसांच्या मते, या दोन्ही व्यक्तींनी सांगितले की, मल्लेशने त्यांच्याशी संपर्क साधून लष्करातून चोरलेली शस्त्रे आणि गोळ्या ते खरेदी करतील का, अशी विचारणा केली होती. दोघेही त्यासाठी तयार झाले होते. भारतीय लष्कराकडून अटकेबाबत तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
Source link
हैदराबादमध्ये लष्कराच्या जवानांनी चोरली होती शस्त्रे:हवालदारच होता मुख्य आरोपी, साथीदारांच्या मदतीने कुलपे तोडली, बँक लुटणार होते; 7 जणांना अटक