Headlines

विक्रम शिंगाडेंवरील विनयभंगाच्या गुन्ह्याने माणमध्ये राजकीय वातावरण तापले:म्हसवड पोलीस ठाण्यासमोर अभयसिंह जगतापांचे ठिय्या आंदोलन




माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभयसिंह जगताप यांनी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना निवेदन दिले. माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनी गुरुवारी (दि. १ सप्टेंबर) माण तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाशी चर्चा केली होती. या पाहणी दौऱ्यावरून सोशल मीडियावरील ‘अॅन्टी व्हायरस’ या ग्रुपमध्ये विक्रम शिंगाडे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. हा मजकूर कोणी पोस्ट केला, याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या विक्रम शिंगाडे आणि अन्य व्यक्तींविरोधात महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला का, याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच सोशल मीडिया ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सकाळी १० वाजल्यापासून कडक उन्हात कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. ‘खोटे गुन्हे सहन केले जाणार नाहीत’ यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी केली. यापुढे खोटे आणि बोगस गुन्हे सहन केले जाणार नाहीत, असे सांगत पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे ते म्हणाले. पोलिसांनी निष्पक्षपणे काम केले नाही, तर त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ‘आज विक्रम शिंगाडेंवर वेळ आली, उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचू शकते’ अभयसिंह जगताप यांनी माण-खटाव तालुक्यात राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि सामान्य नागरिकांविरोधात कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला. राजकीय सूडबुद्धीतून पोलिसांना हाताशी धरून नागरिकांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून नागरिकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी तपास करावा. ज्या सोशल मीडिया ग्रुपवरील पोस्टमुळे वाद निर्माण झाला, ती पोस्ट करणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली. आज विक्रम शिंगाडे यांच्यावर वेळ आली आहे, उद्या अशी वेळ आपल्या घरापर्यंतही पोहोचू शकते. त्यामुळे माण-खटावमधील नागरिकांनी अन्यायाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले. महिला, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती म्हसवड पोलीस ठाण्यासमोर सत्ताधारी आणि पोलीस प्रशासनाच्या कथित अन्यायाविरोधात भर उन्हात झालेल्या या आंदोलनात गावोगावच्या महिला, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायट्यांचे अध्यक्ष व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत विक्रम शिंगाडे यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. या आंदोलनाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बबनशेठ विरकर, बाळासाहेब काळे, दिलीप तुपे, परेश व्होरा, विजय जगताप, सुरेंद्र मोरे, सोहम शिर्के, शहाजी बाबर, अजिनाथ केवटे, शरद गोरड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *