![]()
टर्नओव्हर वाढला, रस्ते काँक्रीटचे झाले, उंच इमारती उभ्या राहिल्या म्हणून विकास झाला, असे मानण्याची वेळ आता संपली आहे. विकासाच्या नावाखाली गावची माती, पाणी, हवा आणि जैवविविधताच गमावली तर हातात उरणार तरी काय? ‘पैसा नव्हे, खेड्यांची परिसंस्था वाचवा!’ असा थेट संदेश कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी दिला. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आयोजित ‘आनंदवन वनमहोत्सव-२०२६’मध्ये मुक्तसंवाद साधताना ते बोलत होते. झाडाला पाणी घालून व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सृष्टीताई सोनवणे होत्या. व्यासपीठावर दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, सरपंच राजेंद्र लवांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ, आयएफएस अक्षय पवार आदी उपस्थित होते. अशोक व्यवहारे यांनी प्रसाद गावडे यांच्याशी संवाद साधला. शहरांमध्ये पाणी आणि ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो; मात्र खेड्यांकडे निसर्गाने दिलेले पाणी, हवा, अन्न आणि जैवविविधतेचे भांडार आहे. त्यामुळे गावांची समृद्धी हीच भविष्यातील सुरक्षा असल्याचे गावडे यांनी सांगितले. विकासाचा मार्ग ‘रिजनल, सीजनल आणि इकॉलॉजिकल’ असावा. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, स्थानिक संसाधनांवर आधारित अर्थव्यवस्था आणि गावाची स्वयंपूर्णता यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरांकडे धाव घेण्याऐवजी तरुणांनी गावातील रोजगार, शेती, स्थानिक उद्योग आणि निसर्गाशी नाते जपावे, तसेच अनिष्ट सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाला संदीप राठोड, लहू बोराटे, गणेश कांबळे, युवराज जगताप, राकेश पवार, प्राणजित बोरसे, संतराम साबळे, तुकाराम भगत, प्रा. सुनील मरकड, सुधाकर ढाकणे, विनायक सुरशे यांच्यासह आनंदवन परिवारातील सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी केले, तर आभार श्रीनिवास एल्लाराम यांनी मानले.्र्र देशी बियाणे म्हणजे संकटाविरुद्धची ढाल हवामान बदल, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीशी जुळणारे पारंपरिक देशी बियाणे महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे देशी वाणांचे संवर्धन, जतन आणि पुढच्या पिढीकडे त्यांचे हस्तांतरण करण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली.
Source link
आनंदवन महोत्सव:पैशांच्या आकड्यांपेक्षा गावाचा श्वास सर्वाधिक महत्त्वाचा, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे प्रतिपादन