![]()
वरुड तालुक्यातील पाक प्रकल्पावर (तलाव) मासेमारी करणाऱ्या कथित बोगस क्रियाशील सदस्यांच्या मुद्द्यावरून येथील वातावरण तापले आहे. दरम्यान, बोगस सदस्यांची चौकशी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तक्रारदार आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, ते सदस्य, असे दोघेही त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, होकार देऊनही कथित बोगस सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. परिणामी, घटनास्थळावरील सर्व नोंदी घेऊन पंचनामा तयार करा, या मागणीसाठी तक्रारदारांनी आग्रह धरला. परंतु तो न पुरवताच अधिकारी आपले वाहन घेऊन निघून गेले. ते अडविण्याच्या प्रयत्नात एक तक्रारदार जखमी झाला. बोगस सदस्यांना मासेमारीपासून रोखण्यासाठी खडका गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वारंवार आंदोलनही केले आहे. नजिकचा वरूड तालुका आणि जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या वर्धा जिल्ह्यातील काही गावच्या परंपरागत व्यवसायिकांना मासेमारीची संधी दिली जाते. परंतु त्यासाठी संस्थांमार्फत क्रियाशील (सक्रिय) सदस्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. अशाच एका संस्थेने नोंदणी तर केली. परंतु त्यातील बहुतेक सदस्य क्रियाशील नसल्याचा दावा इतर व्यवसायिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांना मासेमारी करण्यास मज्जाव करावा, या मागणीसाठी खडका गावातील महिलांनी २५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. ते आंदोलन सोडविताना संबंधित मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मॉन्टी मेश्राम यांनी उपोषणकर्त्यांची तिसऱ्या दिवशी भेट घेतली. ८ सप्टेंबरपर्यंत बोगस सभासदांची तांत्रिक क्रियाशील तपासणी घेऊ, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. परंतु लेखी आश्वासनानंतरही ठराविक कालावधीत तपासणी करण्यात आली नाही. शेवटी पुन्हा त्या महिलांनी ३० सप्टेंबर रोजी पाक प्रकल्प जलाशयामध्ये जलसमाधीचा इशारा दिला. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या यंत्रणेने पुन्हा लेखी आश्वासन दिले. क्रियाशील सदस्यांच्या तपासणीसाठी १ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. १ ऑक्टोबर रोजी यशस्वी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मर्यादित, बारगाव या संस्थेच्या सर्व सभासदांची आम्ही तांत्रिक तपासणी करू, असे लेखी पत्रही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. पुढे त्या पत्रानुसार मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मॉन्टी मेश्राम यांच्यासह इतर अधिकारी पाक प्रकल्पावर दुपारी १२ वाजता पोहोचले. परंतु यशस्वी मत्स्यव्यवसाय संस्थेचा एकही पदाधिकारी, सभासद, क्रियाशील तपासणीकरिता सायंकाळी ५ पर्यंत उपस्थित झाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्या महिलांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना विनंती केली की नैसर्गिक न्याय तत्त्वावर त्या संस्थेला पुन्हा एक संधी देऊन पुढील १० दिवसांपर्यंत पुन्हा क्रियाशील तपासणी घ्यावी. त्यासाठी आजचा स्थळ पंचनामा करून लेखी आश्वासन द्यावे. परंतु लेखी आश्वासन न देता संबंधित अधिकारी गाडीत बसून निघून जायला लागले. यावेळी तक्रारकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते थांबले नाहीत. यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी तापला आहे. दरम्यान एवढा सगळा प्रकार घडल्यावरही बेनोडा पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, असा संबंधितांचा आरोप आहे. त्यांच्या मते गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केली. स्थानिक मत्स्यव्यवसायिकांच्य ा मागण्या रास्त आहेत. त्यासाठी दिलेले आश्वासन पाळण्याचा भाग म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पंचनामा करणे अपेक्षित होते. पुढील तांत्रिक तपासणीबाबत तारीख निश्चित करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता वातावरण चिघळले. मच्छीमार समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. या घटनेचा विविध संघटनांनी निषेध केला. भाजपच्या सहकार भारती मत्स प्रकोष्ठचे प्रदेश प्रमुख वासुदेव सुरजुसे यांच्यासह अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांची दारे ठोठावली आहेत. अधिकाऱ्यांचा सर्वदूर करण्यात आला निषेध
Source link
अधिकाऱ्यांची बेपर्वाई; पंचनामा सोडून पोबारा, तक्रारदार जखमी:मासेमाऱ्यांचे आंदोलन, सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर