![]()
हिंगोली तालुक्यातील पारडा येथे नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिलेल्या शेतकऱ्याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला असून याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 3 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गाववर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील अल्पभुधारक शेतकरी राजुअप्पा भिमाअप्पा तोरकड (50) यांना पारडा शिवारात दिड एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. तसेच या शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. घरी पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून पत्नी व मुलगा देखील त्यांना शेतीकामात हातभार लावत होते. दरम्यान, यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन व इतर पिके घेतली होती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके वाळून गेली. खरीप हंगामातील लागवडीचा खर्चही निघणार नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच सणवार कसे साजरे करावे याची चिंता त्यांना लागली होती. या कारणामुळे ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. दरम्यान, ता. 28 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मुलगा शेतात कामासाठी गेला होता. तसेच पत्नीही बाहेर गेली होती. घरी कोणीही नसल्याने राजूअप्पा यांनी विषारी औषध पिले. सदर प्रकार त्यांच्या शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकार त्यांचा मुलगा तुकाराम यांना सांगितला. त्यानंतर राजूअप्पा यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीयरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच शनिवारी ता. 3 त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम यांनी दिलेल्या माहितीवरून बासंबा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, जमादार विष्णू पोले, अनिल डुकरे पुढील तपास करीत आहेत.
Source link
कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून 50 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या:हिंगोलीमधील पारडाच्या शेतकऱ्यांने घेतले विष, उपचारादरम्यान मृत्यू