Headlines

टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगून फोन बंद:किल्ले रायगडावरून उडी मारल्याचा संशय; 37 वर्षीय तरुण बेपत्ता




किल्ले रायगडावरील टकमक टोक परिसरातून ठाण्यातील सुयोग पांचाळ या 37 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गडावर शोधमोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग काल शनिवारी किल्ले रायगडावर पोहोचला होता. गडावर गेल्यानंतर त्याने घरी फोन करून आपण जीवन संपवत असल्याचे, म्हणजेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. या धक्कादायक फोन कॉलनंतर त्याचा मोबाईल अचानक बंद झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुयोगचा फोन बंद होताच भावाची किल्ल्यावर धाव सुयोगचा फोन बंद झाल्यानंतर त्याचा भाऊ सुवेल पांचाळ याने तातडीने किल्ले रायगड गाठले. गडाच्या पायथ्याशी सुयोगची दुचाकी उभी असलेली त्याला आढळली, मात्र सुयोगचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर कोणताही मार्ग न सापडल्याने सुवेलने तात्काळ महाड तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. टकमक टोक परिसरात शोधमोहीम घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी स्थानिक ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने रायगड परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. सुयोगने टकमक टोकावरून उडी मारल्याचा संशय असल्याने या अवघड दरीच्या आणि आजूबाजूच्या भागात सखोल शोध घेतला जात आहे. काल संध्याकाळी उशिरा ही घटना उघडकीस आल्यापासून मोहीम राबवली जात असली तरी अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. कारणांचा तपास सुरू सुयोगने इतके टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा महाड पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू असून त्याच्या कुटुंबीयांकडूनही अधिक माहिती घेतली जात आहे. सध्या पोलिस प्रशासन, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेपत्ता सुयोगचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *