Headlines

जीवनामध्ये मिळणारे सुसंस्कार यशाच्या शिखरावर पोहोचवतात- किशोर महाराज:कन्नड शहरामधील शांतीनगर येथे श्रीमद् भागवत महापुराण कथा‎




जीवनात मिळणारे उत्तम सुसंस्कार आणि चांगल्या माणसांची संगत हीच मानवाला यशाच्या व सन्मानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवत असते. मानवाच्या जडणघडणीत त्याच्या संगतीचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सत्संगाची कास धरावी, चांगल्या विचारांच्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांशी मैत्री करावी, असे प्रतिपादन किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. शहरातील शांतीनगर, चंपावती नगर येथील नवचैतन्य हनुमान मंदिरात शनिवारपासून आयोजित श्रीमद् भागवत महापुराण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या आरंभदिनी निरूपण करताना ते बोलत होते. किशोर महाराज कासोदेकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘शोभविती येरयेरा, सोनियाच्या ठायी हिरा’ या अभंगाची निरूपणासाठी निवड केली होती. या अभंगाचे अत्यंत सोप्या भाषेत आणि विस्तृत विश्लेषण करताना महाराज म्हणाले की, कुसंगती ही माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरते, तर सत्संगती माणसाच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि महत्त्वाचे सकारात्मक वळण देते. सोने आणि हिरा हे याचे उत्तम उदाहरण आणि समीकरण आहे. हिरा हा निसर्गातील कितीही मौल्यवान आणि अनमोल दगड असला, तरी तो कोणत्या धातूच्या कोंदणात बसवला जातो यावरून त्याचे अंतिम मूल्य ठरत असते. तो जर कथलासारख्या हलक्या धातूमध्ये जडला गेला तर त्याचे मूळ सौंदर्य व मूल्य दोन्ही कमी होते; परंतु तोच हिरा जर सोन्याच्या कोंदणात मढवला गेला, तर हिरा आणि सोने या दोघांचेही मूल्य व शोभा कैक पटीने वाढते. या कथासोहळ्यात संगीताची अतिशय सुरेल आणि भक्तीमय साथ लाभली. यात ढोलकवर श्रीकुमार गिरी, ऑक्टोपॅडवर सतीश महाराज साबळे, सिंथेसायझरवर रतन महाराज साबळे आणि तबल्यावर सचिन राठोड यांनी आपल्या वादनाने कथेला रंगत आणली, तर पाडळकर गुरुजी यांनी ग्रंथ पठण व संहिता वाचन केले. या सोहळ्यास कन्नड शहर आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वाईट विचारांच्या सहवासात गेल्यास विनाश अटळ कासोदेकर महाराजांनी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा या ओळींचा दाखला दिला. ते म्हणाले की, कितीही ज्ञानी, सज्जन किंवा गुणी व्यक्ती असली आणि ती जर दुष्टांच्या किंवा वाईट विचारांच्या सहवासात गेली, तर तिचा विनाश अटळ असतो. आजच्या धावपळीच्या युगात विशेषतः तरुण पिढीने वाईट व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आई-वडिलांची, समाजाची निष्काम भावाने सेवा करून आपले जीवन अर्थपूर्ण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक अरुण ब्राह्मणकर, बाबासाहेब महाले यांनी केले. नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, गोकुळ राठोड, काकासाहेब कवडे, रमेश गिरी, उत्तम गिरी, अशोक वाळुंजे यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी भेट दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *