Headlines

नाशिक कुंभमेळा साधेपणात करा:अनावश्यक खर्च टाळून निधी शेतकरी, शेती-पाणी नियोजनासाठी वापरा, काँग्रेसची मागणी




राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता नाशिक येथील कुंभमेळा साधेपणात आयोजित करावा. मेळाव्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी शेतकरी, शेती आणि पाणी नियोजनासाठी वापरावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२६ च्या खरीप हंगामासाठी राज्य सरकारने २५ सप्टेंबर रोजी ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. हा निर्णय दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील ‘ट्रिगर-१’ निकषांनुसार घेण्यात आला. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी आणखी ४३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०८ झाली आहे. राज्यातील ३५८ पैकी ३०८ तालुके दुष्काळग्रस्त असल्यास परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. अशा पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याचे आयोजन अत्यंत साधेपणाने करणे आवश्यक आहे. याबाबत सरकारने विरोधकांसह सर्वपक्षीय बैठक किंवा दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि महाराष्ट्रातील दुष्काळ व पाणीटंचाईची वस्तुस्थिती देशासमोर मांडावी, अशी मागणी तिवारी यांनी केली. कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी तसेच कुशावर्त कुंडातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा सध्याच्या लोकसंख्येच्या गरजांसाठीच काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता असताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही. पैसा केंद्राकडून किंवा अन्य मार्गाने उपलब्ध करता येऊ शकतो; मात्र पाण्याचा स्रोत निर्माण करणे सहज शक्य नसल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *