Headlines

शेतीतील प्रयोग:20 गुंठ्यांमध्ये झेंडूचे 3 लाखांचे उत्पन्न, चव्हाणवाडीत पेरूच्या अंतर्गत फळबागेत झेंडूची लागवड‎




पेरूच्या फळबागेत आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करून अवघ्या २० गुंठे क्षेत्रातून तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग चव्हाणवाडी (ता. माढा) येथील ७० वर्षीय शेतकरी रमेश पंढरीनाथ नांगरे यांनी केला आहे. पेरूच्या बागेचे उत्पादन सुरू होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा सदुपयोग करत त्यांनी झेंडूचे आंतरपीक घेतले. नियोजनबद्ध लागवड, ठिबक सिंचन आणि कुटुंबाच्या मेहनतीच्या जोरावर तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळाल्याने हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी लक्षवेधी ठरला आहे. नांगरे यांनी पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची लागवड केली. सहा फूट बाय १.२५ फूट अंतरावर लागवड करून एकूण तीन हजार रोपे लावण्यात आली. एका रोपासाठी तीन रुपये खर्च आला. ठिबक सिंचनाद्वारे दररोज दोन वेळा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. झेंडूची नियमित निगा राखत फुलांची तोडणी सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे तीन तास तीन जण तोडणीचे काम करीत होते. फुलांची तोडणी व इतर कामांमध्ये शेतकरी रमेश नांगरे यांना त्यांची पत्नी मालन रमेश नांगरे, मुलगा औदुंबर रमेश नांगरे तसेच मुलाचीही मदत मिळाली. कुटुंबातील सदस्यांनीच शेतीकामात हातभार लावल्याने मजुरीवरील खर्चही नियंत्रणात ठेवता आला. झेंडूला बाजारात कमाल १२० रुपये, तर किमान ५० रुपये किलोपर्यंत दर मिळाला. तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पादित फुलांची विक्री टेंभुर्णी येथील मॉलमध्ये, तसेच बिग बास्केटसाठी करण्यात आली. पेरू उत्पन्नाची वाट पाहण्यापेक्षा आंतरपिकातून ७० वर्षीय शेतकरी नांगरी यांनी घेतले उत्पन्न “पेरूची बाग लावल्यानंतर त्याचे उत्पन्न मिळण्यासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागतो. तोपर्यंत फक्त बागेच्या उत्पन्नाची वाट पाहत बसण्यापेक्षा बागेचा खर्च काही प्रमाणात निघावा आणि कुटुंबालाही शेतीत काम मिळत राहावे, या उद्देशाने झेंडूचे आंतरपीक घेतले. योग्य नियोजन केल्यास कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून अनुभवायला मिळाले,” असे शेतकरी रमेश नांगरे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *