Headlines

साहेब… टँकरने पाणी आणून पीक जगवतोय‎‎:कटफळ येथे पालकमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद , पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही‎


.

दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी व ग्रामस्थ यांची भेट घेतली. गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत चारा डेपो सुरू करण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच तुळशी गावातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माढा तालुक्यातील तुळशी येथील पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, रणजीत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले यांच्यासह दुष्काळ निवारणाशी संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसान, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता तसेच चारा डेपो सुरू करण्याबाबतच्या मागण्या व अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित राहणार नाही, तसेच पंचनामे न झाल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी दिवशी दुपारी बारा वाजता सांगोला तालुक्यातील महूद व कटफळ गावातील दुष्काळाची पाहणी केली. शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरती जाऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी कटफळ गावातील शेतकऱ्यांनी शेतीला टँकरने पाणी देतो आहोत, एका टँकरला तीन हजार रुपये द्यावे लागतात व तसेच आमच्या कटफळ गावाला राजेवाडी तलावातून पाणी ताबडतोब सोडावे नाहीतर आमची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे, अशी मागणी करत पालकमंत्र्यांना निवेदन दिले. पालकमंत्री गोरे यावेळी म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्व नुकसान पंचनामे ताबडतोब करून घेतले जातील. खरीपसोबत फळबागेचे सुद्धा नुकसान देण्याचे आश्वासन दिले.

प्रतिनिधी | महूद दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या शंभर टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत. यामध्ये केवळ पिकांचेच नव्हे, तर ऊस, फळबागा तसेच अन्य पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचाही समावेश करावा. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पालकमंत्री गोरे जिल्ह्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत पाहणी केली. सांगोला तालुक्यातील कटफळ येथे भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब… टँकरने पाणी आणून पिके जगतोय, अशी व्यथा मांडली. तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शहाजी पाटील, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे पालकमंत्री श्री. गोरे यांनी थांबून ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्या मांडणारे निवेदन त्यांना दिले. स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन संबंधित यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गार्डी गावाला कासाळ ओठ्यावरील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थितीत गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित तलावात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.

सरसकट भरपाईच्या प्रश्नावरती पालकमंत्री म्हणाले ज्या पिकांचे नुकसान झाले आहे असे एकही पीक पंचनामा झाल्याशिवाय राहणार नाही अशा सूचना कलेक्टर, तहसीलदार, तलाठी, कृषी विभाग सर्वांना देण्यात आलेले आहेत. दुष्काळामध्ये मजुरांच्या हाताला काम नाही यासाठी ताबडतोब मनेरेगा योजनेतून असणाऱ्या कामाची सुरुवात करण्यासाठी सूचना दिलेले आहेत जनावराच्या व वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था ही करण्यात येईल तसेच जिथे चारा उपलब्ध नाही तेथे चारा डेपो दिले जातील. याबाबत शासन निर्णय लवकरच होईल त्या संदर्भात मंगळवारी बैठक बोलावलेली आहे असे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे, पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करणे आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *