Headlines

राज्यात ऑक्टोबर हीटचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट:मुंबईचा पारा 36 अंशांवर, अकोल्यात सर्वाधिक उष्णता




राज्यातून मान्सूनने परतीची वाट धरल्यानंतर आता उन्हाचा कडाका अचानक वाढू लागला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार चटका बसत आहे. वाढत्या उष्णतेच्या आणि उकाड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. एकीकडे उन्हाचा चटका आणि दुसरीकडे पावसाअभावी निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती, यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून हाताला काम नसल्याने शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. तापमानाचा पारा वाढला; अकोल्यात सर्वाधिक उष्णता राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत असून, रविवारी मुंबईत कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी जास्त असल्याने दुपारच्या वेळी मुंबईकरांना उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. संपूर्ण राज्यात विदर्भात ऑक्टोबर हीटचा सर्वाधिक प्रभाव दिसत असून अकोल्यात राज्यातील सर्वोच्च ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच अमरावती (३६.४), चंद्रपूर (३६.४), वर्धा (३६), बुलढाणा व ब्रह्मपुरी (३५.२) आणि नागपूर व वाशिम (३५ अंश) येथेही उन्हाचा चटका वाढला आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर (३६ अंश), परभणी (३५.३ अंश) आणि धाराशिव (३३.१ अंश) येथे तापमानाचा पारा चढाच आहे. दुष्काळाच्या झळा आणि पाण्याचे भीषण संकट यंदा पावसाळ्याने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी भीषण दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. विहिरी आणि बहुतांश जलस्रोत कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरिपातील सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला असून, शेतकऱ्यांना मदत देण्यासोबतच त्यांच्याकडून सक्तीची कर्जवसुली न करण्याचे निर्देश दिले आहेत. रोजगारासाठी दसरा-दिवाळीआधीच शहरांकडे धाव पावसाअभावी शेतात कोणतीही कामे शिल्लक नसल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, शेतमजूर आणि गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांनी दसरा आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या आधीच गाव सोडून पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. हेही वाचा.. यूपीच्या लखनऊत रस्त्यांवर चालत आहेत बोटी: बिहारमध्ये 8 लाख लोकसंख्येला पुराचा वेढा, एमपीत 3 दिवसांनंतर बदलेल हवामान
उत्तर प्रदेशात 9 दिवसांपासून पाऊस झाला नाही, मात्र पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये 10 नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने 40 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बिहारमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत खराब आहे. गंडक नदीला आलेला पूर आणि तटबंदी तुटल्यामुळे 6 जिल्ह्यांतील सुमारे 466 गावे पुराच्या विळख्यात आहेत. त्यामुळे सुमारे 8 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 92,730 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *