![]()
महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असून, गांधीवाद ही जगातील अभूतपूर्व व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे. शस्त्राशिवाय अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा उभा करणारे गांधीजी हे जागतिक इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. “त्यांचे आचार हाच गांधीवाद असून, गांधीवाद हा धार्मिक, आध्यात्मिक मानवतावाद आहे,” असे प्रतिपादन श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर, यांच्यातर्फे २ ऑक्टोबरला आयोजित गांधी जयंती उत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा गांधी यांच्या विचारांवर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. तराळ म्हणाले की, गांधीवादाचा प्रभाव भारतापुरता मर्यादित नसून त्याचा जगावर प्रभाव पडला आहे. जगातील मोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही गांधीजींच्या अहिंसेचे, नैतिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले होते. गांधीजींनी आत्मपरीक्षण व आत्मज्ञानातून जीवनातील उच्च नैतिक मूल्यांचा शोध घेतला. त्यामुळे गांधी हे एका कालखंडापुरते मर्यादित व्यक्तिमत्त्व नसून कालातीत विचारांचे प्रतीक आहेत.यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, स्वावलंबन, सामाजिक सलोख्याच्या विचारांसह महात्मा फुले यांच्या सामाजिक समता व शिक्षणाच्या विचारांचे, लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांचे स्मरण केले. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून विवेकवादी व मानवतावादी समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिलीप काळे, पुरुषोत्तम गावंडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. मंदा नांदुरकर, ॲड. नीता कचवे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, प्रा. नेहा भटकर, प्राचार्य दादा दाभाडे, अनिल पांचाळे, प्रा. नरेंद्र राऊत, डॉ. श्रीधर जावरकर आदींनी विचार मांडले.डॉ. राणी नागापुरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मंदा नांदुरकर यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमा साठी महात्मा फुले शताब्दी जन्मोत्सव समिती, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, मराठी जनसाहित्य परिषद, आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ, आदिसंपदा, बौद्धिलकी प्रतिष्ठान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सर्वोदय मंडळ अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, शहीद समाज सेवा समिती आदी समविचारी संस्था व संघटनांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रतिभा खापरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानद संस्थापक व सचिव श्री वसंतराव वंडलकर, कार्याध्यक्ष श्रीधरराव डहाके आणि कोषाध्यक्ष रामदासजी सदार तसेच श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Source link
गांधीवाद आध्यात्मिक मानवतावाद- डॉ. सतीश तराळ:महात्मा गांधीजींचे आचार हाच गांधीवाद; सत्य, अहिंसा, सर्वोदय आणि सत्याग्रहाची जगाला देण