.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच सामाजिक बांधिलकीची अनोखी परंपरा जपत अमरावती ग्रामीण पोलीस दलाने निसर्ग संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश विसर्जन घाटांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ३ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हे अभियान एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात पार पडले. गणेशोत्सवानंतर जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण रोखणे आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नैसर्गिक साठे सुरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे. हाच सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे मनुष्यबळ घाटांवर उतरले होते. अमरावती परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या वर्धा नदीकाठच्या ऐतिहासिक कौंडण्यपूर येथील दोन मोठ्या विसर्जन घाटांवर विशेष स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्वतः श्रमदान करत मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत पोलीस मुख्यालयातील चमू तसेच कुऱ्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार असे मिळून २० अधिकारी आणि १३० अंमलदारांनी कौंडण्यपूर घाट परिसर चकाचक केला.केवळ कौंडण्यपूरच नव्हे, तर ग्रामीण भागातील सर्व ३१ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नद्या, तलाव, धरणे, विसर्जन स्थळांवर ही मोहीम राबवली. जिल्हाभरात एकूण ११२ अधिकारी आणि ७८५ अंमलदारांनी कर्तव्यभावनेतून उत्स्फूर्तपणे एकत्र येत घाटांवर साचलेले निर्माल्य, प्लास्टिक आणि अन्य कचरा गोळा करून सुरक्षित विल्हेवाट लावली. जलप्रदूषण टाळणे, नद्यांचे आरोग्य जपणे ही प्रशासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला. खाकी वर्दीतील लढवय्यांनी हातात झाडू घेऊन दाखवलेली ही तत्परता आणि पर्यावरण संवर्धनाप्रती दाखवलेली बांधिलकी यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.
स्वच्छ घाट, सुंदर वाटपूर पोलीस स्टेशन लोणी हद्दीतील वाटपूर विसर्जन घाट येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शनिवारी सकाळी दोन तास घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक व अस्वच्छता दूर करण्यात आली. यावेळी लोणीचे ठाणेदार विलास सानप, ठाण्याचे अंमलदार व नागरिकही उपस्थित होते. या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. मोहिमेत सहभागी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.