महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत एक पाऊल पुढे टाकल
.
रोहित पवार म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि त्यांच्या स्वप्नांवर होणार आहे. “नेता म्हणून पुढील काही वर्षांत तुम्हाला कदाचित फरक पडणार नाही. राजकारणी म्हणूनही पुढील तीन वर्षांत फरक पडणार नाही. पण या काळात पेपर फुटला, भ्रष्टाचार झाला, तर या विद्यार्थ्यांच्या भविष्याला कोण जबाबदार राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर मुख्यमंत्री जबाबदारी घेणार का?’
MPSCच्या प्रश्नावर सरकारने केवळ तात्पुरते निर्णय न घेता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. आंदोलनादरम्यान एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “उद्या-परवा एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, तर मुख्यमंत्री साहेबांनी लिहून द्यावं की मी जबाबदार आहे. आहे का हिंमत तुमच्यात?” अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असताना निर्णय घेताना सरकारने आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलू नये, अशी टीकाही त्यांनी केली. “विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि इथे निर्णय घेताना वैधानिक पत्र लिहून स्वतःची जबाबदारी राज्यपालांवर ढकलून मोकळे होता. काय चाललंय या महाराष्ट्रात? कुठे नेऊन ठेवलं आपलं संविधान?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
विद्यार्थ्यांसमोर सरकारला दिलेला प्रस्ताव मांडणार
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला एक प्रस्ताव देण्यात आल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना हा प्रस्ताव नेमका काय होता, याची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आज संध्याकाळी विद्यार्थ्यांशी बोलताना आमचा प्रस्ताव काय होता, हे सांगणार आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या परवानगीने तो प्रस्ताव त्यांच्या मोबाईलवर आम्ही पाठवला होता. हा प्रस्ताव नेमका काय होता, हे विद्यार्थ्यांसमोर सांगणार आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका
यावेळी पत्रकारांनी फॉर्म 16 मध्ये बेकायदेशीरपणे बदल करण्यात आल्याचा राहुल गांधींचा दावा आणि निवडणूक प्रक्रियेबाबतच्या आरोपांवर प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन केले.
“राहुल गांधी जे बोलतात ते बरोबर आहे. तिथे जे बाकीचे इलेक्शन कमिशनर आहेत, त्यांनीसुद्धा हेच सांगितले की आम्हाला विश्वासात न घेता या व्यक्तीने फक्त नेत्यांचे ऐकून काहीतरी घोळ केला,” असा दावा त्यांनी केला.
याच मुद्द्यावरून त्यांनी मतदारांची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुकांचाही संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “13 कोटी मतदान जे भारतीयांचं होतं ते काढण्यात आलं आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच या कथित घोळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये निवडणुका झाल्या आणि भाजप विजयी झाला, असा दावा करत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली.
‘MPSCमध्येही असंच होणार का?’
निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांचा संदर्भ देत रोहित पवार यांनी MPSCच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. सरकारने सध्याचा प्रश्न केवळ तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पुन्हा पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन अशी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
“इथे हे असंच थातूरमातूर तीन महिने काढणार. त्यात एखादा अजून पेपर फुटणार. विद्यार्थी आंदोलन करणार. त्यातला एखादा विद्यार्थी कुठेतरी उपोषण करणार, नाहीतर आत्महत्या करणार. सरकार म्हणणार वाईट झालं, आम्ही पाच लाखांची मदत करतो. अरे, काय होणार आहे त्या पाच लाखांच्या मदतीमध्ये?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ एखादी घटना घडल्यानंतर आर्थिक मदत जाहीर करून प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
‘संविधानाला बाजूला सारून रशियाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न’
शेवटी रोहित पवार यांनी सरकारच्या कारभारावर आणि घटनात्मक संस्थांच्या कामकाजावर गंभीर टीका केली. निवडणूक आयोग असो किंवा MPSC, संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाजूला सारण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. “हे जे काही चाललंय ना, संविधानाचा खेळ, तो इलेक्शन कमिशनमध्ये असो नाहीतर आमच्या MPSCमध्ये असो, हे मात्र बरं नाही, योग्य नाही. आपण कुठे ना कुठेतरी संविधानाला बाजूला सारून रशियाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न 100 टक्के करत आहोत,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आंदोलकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
गोरेगाव फिल्म सिटीतील शूटिंग सेटला आग:’एमटीव्ही हसल’च्या महाअंतिम सोहळ्यावेळी उडाली खळबळ, PCR युनिटमध्ये दुर्घटना

सोमवारी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमधील एका तात्पुरत्या शूटिंग सेटवर आग लागली. ही घटना प्राईम फोकस स्टुडिओच्या मागे असलेल्या तात्पुरत्या सेटवर घडली. दुपारी 4:02 च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सायंकाळी 4:55 पर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. सविस्तर वाचा…