Headlines

छावणीत पोलिसांवर हल्ला; 8 जणांवर गुन्हा, 5 अटकेत:जमावाने गोवंश वाहतुकीचा ट्रक घेतला ताब्यात




छावणीतील एका मॉलसमोर रविवारी रात्री ११.४५ वाजता गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक (एमएच-१६-डीएल-५२८५) अडवून ६०-७० जणांच्या जमावाने कायदा हातात घेतला. परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यात अंमलदार दीपक सोनवणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणारे तरुण आणि क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबून नेणारा ट्रकचालक, अशा दोन्ही बाजूंवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची २ पथके तयार करण्यात आली आहेत. रात्रगस्तीवरील सोनवणे व होमगार्ड मुळे घटनास्थळी पोहोचले तेव्हा ट्रकमध्ये गोवंश जातीची १६ जनावरे कोंबलेली होती व जमावाने ट्रकची चावी काढली होती. सोनवणे यांनी कायदेशीर कारवाईसाठी चावी मागितली, मात्र जमावाने हुज्जत घातली. कुमक मागवून सोनवणे यांनी होमगार्डला ट्रकमध्ये बसवून वाहन ठाण्यात नेण्याचाप्रयत्न केला. याचा राग येऊन जमावाने त्यांना मारहाण केली. हल्लेखोरांवर दंगलीचा गुन्हा नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश आणि लखन यादव ऊर्फ बाबा या ८ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. छावणी ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांच्या माहितीनुसार, ५ जणांना अटक करून न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चालकाकडे केवळ १० जनावरांची परवानगी ड्युटी ऑफिसर सुरेश माळी यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक रोशन संजय थिटे (२६, रा. गारगाव, जि. अहिल्यानगर) याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. हा ट्रक सिल्लोड येथील कारखान्यातून कामगारांचे बैल घेऊन अहिल्यानगरला जात होता. १० जनावरांची परवानगी असताना त्याने १६ बैल क्रूरपणे कोंबल्याने पोलिसांनी ट्रक व जनावरे जप्त केली. मध्यरात्री पावणेबारा वाजता जमाव कसा जमला शहरात रात्री गोवंश वाहतुकीच्या संशयावरून वाहने अडवण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी मध्यरात्री काही मिनिटांतच ६० ते ७० तरुणांचा जमाव केशर मॉलसमोर कसा गोळा झाला? वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती या तरुणांना कुणी दिली? शहरात पाळत ठेवून मध्यरात्री संदेश देणारी कोणती यंत्रणा सक्रिय आहे का, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *