Headlines

चितेगाव येथे बोअरवेलला दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी:केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात‎




पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चितेगाव येथील गांधीनगर आणि साईनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून १०० हून अधिक बोअरवेलमधून दूषित, काळे व फेसयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नळाला व बोअरवेलला येणाऱ्या या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चितेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाण्याचे ५ लिटरचे दोन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणी प्रक्रियेत एक चिंतेची बाब समोर आली आहे. प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी प्राथमिक रासायनिक निकषांनुसारच होणार आहे. पाण्यातील घातक रसायने अथवा जड धातूंची सखोल तपासणी या चाचणीत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, परिसरातील केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळेच भूजल दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित कंपन्यांची कडक तपासणी करण्याची आणि गावात तातडीने टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. अहवाल येईपर्यंत पाणी पिऊ नका : डॉ. आगास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण आगास यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. पाणी शुद्ध असल्याचा अधिकृत अहवाल येईपर्यंत हे पाणी पिऊ नये. वापरणे गरजेचे असल्यास ते चांगले उकळून व गाळूनच वापरावे. त्रास जाणवल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असा सल्ला डॉ. आगास यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *