![]()
वसई शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वतःचा मुलगा आणि त्याच्या मित्राकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना नायगाव परिसरात घडली. गॅब्रिएल डॉमिनिक कुटीनो असे या मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली मुलगी रूपा नोयल चिरायत हिची भेट घेऊन तिच्याकडे एक बॅग सुपूर्द केली होती, ज्यामध्ये सुसाईड नोट आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समोर आले आहे. या खळबळजनक घटनेने संपूर्ण वसई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी रूपा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा भाऊ शाम कुटीनो हा मागील 12 ते 13 वर्षांपासून वडिलांना क्षुल्लक कारणांवरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. 26 सप्टेंबर रोजी घरात अंड्याचे शेल्फ फुटल्याच्या साध्या कारणावरून शामने वडिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर शामचा मित्र सागर यानेही त्यांना मारहाण केली. एवढेच नाही, तर या दोघांनी गॅब्रिएल यांच्या हातातील जेवणाची थाळी हिसकावून घेत त्यांना उपाशीपोटी घराबाहेर हाकलून दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मुलीकडे सोपवली महत्त्वाची बॅग या जाचाला कंटाळलेले गॅब्रिएल कुटीनो 28 सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलीला ती काम करत असलेल्या शाळेत जाऊन भेटले. त्यांनी मुलीकडे एक बॅग दिली आणि त्यात महत्त्वाची कागदपत्रे व काही पैसे असल्याचे सांगितले. तिथून ते थेट नायगाव रेल्वे स्थानकावर गेले आणि धावत्या लोकलसमोर उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नंतर जेव्हा मुलीने ती बॅग उघडून पाहिली, तेव्हा त्यात वडिलांनी लिहिलेली एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली. त्यात मुलगा शाम आणि त्याचा मित्र सागर यांच्या जाचाला कंटाळूनच आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल या अत्यंत संतापजनक घटनेचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे, गॅब्रिएल यांना मारहाण व छळ केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद या गंभीर प्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत मुलगा शाम आणि त्याचा मित्र सागर या दोघांविरोधात ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
मुलाच्या जाचाला कंटाळून वडिलांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या:मुलीला शेवटचे भेटून लोकलसमोर मारली उडी; वसईत खळबळ