![]()
“आरोग्यसेवा ही केवळ उपचार करण्याची प्रक्रिया नसून, ती समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज आज अधिक तीव्र झाली आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. रुग्ण हक्क परिषदेने समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची शिकवण पेरल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, जानमहम्मद पठाण, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठे, ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अशोक शिंदे, मुकेश मोहिते आदी उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “रुग्ण हक्क परिषदेने सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीची शिकवण समाजात पेरली आहे. आरोग्याच्या प्रश्नांसोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम परिषद करीत आहे, साहित्य आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा संवाद समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो. त्यामुळे आरोग्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक चळवळीला नवी दिशा मिळेल.” यावेळी डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाची, तसेच संमेलनाध्यक्षपदी डॉ. अविनाश भोंडवे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. डॉ. भोंडवे यांनी वैद्यकीय सेवेसह आरोग्य व इतर विषयावर २४ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. उमेश चव्हाण म्हणाले, “रुग्णांच्या हक्कांसाठी लढताना आम्ही केवळ आरोग्याचा प्रश्न हाताळत नाही, तर प्रत्येक नागरिकाला न्याय आणि सन्मान मिळावा यासाठी काम करीत आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा आणि रुग्णांच्या हक्कांची जाणीव पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आगामी काळात सामाजिक एकोपा आणि मानवतावादी विचार अधिक व्यापक करण्यासाठी परिषद काम करेल.” भानुप्रताप बर्गे म्हणाले, “रुग्ण हक्क परिषदेचे कार्य हे सामाजिक जाणीव आणि आरोग्यसेवा यांचा सुंदर समन्वय साधणारे आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याची भावना मजबूत होते.” यावेळी चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला. अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
Source link
रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज:ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत