![]()
वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्यासाठी आलेल्या इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि पेट्रोलपंप चालकाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यानंतर कंपनीच्या विक्री विभागातील व्यवस्थापकाचा खंजरने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी (6 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महेश शेळके असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांच्यावर खंजरने तब्बल 7 वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर संशयित आरोपी उमेश पांडववीर याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी पेट्रोलपंपाला मंजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी शिवारात इंडियन ऑईलच्या वतीने साहेबराव पांडववीर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी पेट्रोलपंप मंजूर करण्यात आला होता. मंजुरीनंतर त्यांनी पेट्रोलपंप सुरू केला होता. मात्र, मागील सुमारे तीन महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे पेट्रोलपंप बंद होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्रीही ठप्प होती. पेट्रोलपंप दीर्घकाळ बंद असल्याने इंडियन ऑईलच्या नांदेड कार्यालयाकडून कारवाई करण्यात येत होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे काही अधिकारी व कर्मचारी पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्यासाठी चोंढी येथे पोहोचले होते. या पथकात कंपनीच्या विक्री विभागाचे व्यवस्थापक महेश शेळके यांचाही समावेश होता. एक महिन्याची मुदत देण्याची मागणी पेट्रोलपंपावर पोहोचल्यानंतर कंपनीचे अधिकारी आणि पांडववीर कुटुंबीय यांच्यात चर्चा सुरू झाली. पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत द्यावी, त्यानंतर पेट्रोलपंप सुरू केला जाईल, अशी भूमिका पांडववीर कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र, कंपनीचे अधिकारी पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. चर्चा सुरू असतानाच परिस्थिती अचानक चिघळली. अचानक खंजरने हल्ला वाद सुरू असतानाच तेथे उपस्थित असलेल्या उमेश पांडववीर याने महेश शेळके यांच्यावर अचानक खंजरने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी घाबरले. त्यांनी घटनास्थळावरून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेळके यांना मदत करण्यासाठी तत्काळ कोणीही पुढे येऊ शकले नाही. संशयित उमेश याने शेळके यांच्या पोटावर, पाठीवर आणि तोंडावर खंजरने सात वेळा वार केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झाल्याने शेळके रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर उमेश पांडववीर याने घटनास्थळावरून पळ काढला. कुरुंदा पोलिसांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक गंधकवाड, कारामुंगे, गुट्टे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी महेश शेळके यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या संशयित उमेश पांडववीरचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे चोंढी परिसरात खळबळ उडाली आहे. पेट्रोलपंप सील करण्याच्या कारवाईवरून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा… फटाका साठवणुकीच्या ठिकाणी प्रशासनाचे छापे:हिंगोलीत 1,390 किलो फटाके जप्त, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठ्याला आग लागून मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने रहिवासी भागातील फटाका साठ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. 6) नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी तपासणी करत तब्बल 1 हजार 390 किलो फटाक्यांचा साठा जप्त केला. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेल्या चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा
Source link
चोंढीत पेट्रोलपंप सील करण्यावरून वाद:इंडियन ऑईलच्या व्यवस्थापकाचा खंजरने 7 वार करून खून