![]()
लाखो रुपये किंमत असलेल्या वीज पंपाच्या केबल वारंवार चोरीस जात आहेत. यामुळे मोठे नुकसान झाल्याने लोणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी अचानक जामनेर-फत्तेपूर रोडवर रास्ता रोको केला. जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतापासून तर पाणी उचलायचा ठिकाणापर्यंत केबल टाकून वीज पंप बसविले आहेत. मात्र किंमती तांब्यासाठी केबल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान होत आहे. चोरी प्रकरणांबाबत तक्रार करूनही चोरट्यांचा शोध लागत नाही. यामुळे लोणी ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत सोमवारी रास्ता रोको केला. यामुळे जामनेर फत्तेपूर रस्त्यावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. एपीआय अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला. शेतापासून पाणी उचलाचे अंतर जास्त असल्याने ॲल्युमिनियम वायरमुळे पुरेसे व्होल्टेज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तांब्याच्या तार असलेल्या वायर वापराव्या लागतात. बाजारात आठ हजार रुपये किलो भाव असल्याने तांब्याच्या वायर चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे चोरीस गेलेली वायर त्या बदल्यात घ्यावी लागणारी दुसरी वायर व दरम्यानच्या काळात पाण्याअभावी होणारे पिकाचे नुकसान पाहता शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान होत आहे.
Source link
पंप, केबल चोरीविरुद्ध रास्ता रोको:संतप्त शेतकऱ्यांनी अडवला जामनेर-फत्तेपूर मार्ग; पोलिसांविरुद्ध प्रचंड रोष