![]()
विधान परिषद अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सत्ताधारी महायुती, विरोधी बाकावरील मविआ अशा दोन्ही गटांत फूट पडली. महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असली तरी भाजप, युवा स्वाभिमान पार्टीने शड्डू ठोकला. मविआत कुणासाठी जागा सोडायची, हे ठरले नाही. परंतु काँग्रेस, शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. शिवसेनेतही अंतर्गत फूट पडली. पक्षाने मावळते आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली. परंतु गेल्यावेळचे पराभूत उमेदवार, शिवसैनिक प्रा. श्रीकांत देशपांडे मैदानात उतरले आहेत. भाजपतर्फे शेखर भोयर, संगीता शिंदे-बोंडे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढायचे ठरवले. हे दोघेही गतवेळचे पराभूत उमेदवार असून, भाजपच्या शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसमन्वयक आहेत. महायुतीचा स्थानिक घटक पक्ष आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पार्टीने मनपाच्या शिक्षण सभापती ॲड. प्रीती रेवणे-बनारसे यांची उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महायुतीचा एक उमेदवार ठरतो की सगळे पक्ष मैत्रीपूर्ण लढतीच्या सूत्रानुसार लढतात, याच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ९ ऑक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ‘मविआ’तील शिवसेना उबाठा पक्षाने उमेदवाराचे नाव घोषित करुन बुलडाणा येथील दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी दाखल केली. माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या अदिती पोहरे-देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षाचे तिकीट मिळवल्यामुळे मविआत फाटाफूटीवर शिक्कामोर्तब झाले. संघटना होणार का इतिहासजमा ही निवडणूक राजकीय पक्षातर्फे लढवली जात नाही. त्यात पक्षाचे निवडणूक चिन्ह नसते. त्यामुळे गेल्या निवडणुकीपर्यंत ती शिक्षक संघटनांमार्फतच मर्यादित होती. या वेळी मात्र चित्र वेगळे आहे. काल पर्यंत जे संघटनांच्या बॅनरखाली लढायचे, त्यांनी कुण्यातरी राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वळण मिळाले आहे.
Source link
विधान परिषद निवडणूक; मविआ, महायुतीत उभी फूट:दोन्ही गटांकडून एकाहून अधिक उमेदवार