![]()
येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद (सीसीआरएच), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ‘ड्रग प्रूव्हिंग ओरिएंटेशन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. होमिओपॅथीमधील औषध सिद्धता (ड्रग प्रूव्हिंग) या महत्त्वपूर्ण संशोधन प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना शास्त्रीय व संशोधनाभिमुख ज्ञान मिळावे, हा कार्यशाळेचा उद्देश होता. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सीसीआरएच, नवी दिल्लीच्या ड्रग प्रूव्हिंग कमिटीच्या समन्वयक व रिसर्च ऑफिसर डॉ. प्रिथा मेहरा प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी होमिओपॅथिक औषध सिद्धतेची शास्त्रीय संकल्पना, कार्यपद्धती, संशोधनातील महत्त्व, औषध सिद्धतेचे विविध टप्पे तसेच या प्रक्रियेत आवश्यक असणारी शास्त्रीयता व नैतिक बाबी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अजय दहाड, उपप्राचार्या डॉ. संगीता दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रूव्हिंग मास्टर डॉ. स्वप्ना थोरात, प्रूव्हिंग सहाय्यक डॉ. शालिनी शर्मा, प्रूव्हिंग टीम सदस्य डॉ. नीलेश देवरे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ओरिएंटेशन कार्यशाळेत पदव्युत्तर व पदवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना ‘ड्रग प्रूव्हिंग’ या होमिओपॅथीतील महत्त्वपूर्ण संशोधन क्षेत्राची वैज्ञानिक पद्धतीने ओळख झाली. सीसीआरएचसारख्या राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास तसेच होमिओपॅथीमधील वैज्ञानिक संशोधनाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Source link
पदवी व पदव्युत्तरांना संशोधन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन:चांदवड येथील के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात ‘ड्रग प्रूव्हिंग ओरिएंटेशन’ कार्यक्रम