“भाजयुमोचे नवनाथ बन यांनी माझ्यावर राजकीय आकसापोटी आणि एमपीएससीच्या (MPSC) पवित्र आंदोलनाला बदनाम करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले आहेत. मी नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा ठोकणार असून त्यांना थेट न्यायालयात खेचणार आहे. त्रास सहन करणाऱ्या
.
पुण्यातील एमपीएससी आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी कथित कोरेगाव पार्क राड्याचा व्हिडिओ जारी केल्यानंतर, शिवराज मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सर्व आरोपांचे खंडन केले. तसेच आपली नार्को टेस्ट आणि रक्त तपासणी करण्याचे थेट आव्हान गृहखात्याला दिले.
आंदोलनाला बदनाम करण्याचा पोलिसांचा व सरकारचा डाव; 48 तासांपासून ट्रॅकिंग
व्हिडिओच्या सत्यतेवर आणि पार्श्वभूमीवर बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “हा व्हिडिओ 1 ऑक्टोबरचा असून मी अलका टॉकीज चौकातील उपोषणाला बसण्यापूर्वी दोन दिवस आधीचा आहे. आंदोलन दडपण्यासाठी आणि मला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी पुणे पोलिसांची मोठी यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी गेल्या 48 तासांपासून प्रयत्न करत होते. माझे कॉल डिटेल्स (CDR) आणि लोकेशन आधीच तपासले गेले आहेत.”

10 ते 15 मिनिटांत बाहेर पडलो
“मी कोरेगाव पार्क परिसरात केवळ 10 ते 15 मिनिटे होतो. तिथे कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मोडतोड करून (मॉर्फ करून) मला आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या लढ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजप रचत आहे.”
त्या रात्री नक्की काय घडले? शिवराज मोरेंचा खुलासा
कोरेगाव पार्क लेन नंबर 7 मधील घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना त्यांनी स्पष्ट केले. “हैदराबादला राहणाऱ्या माझ्या एका मित्राची बहीण पुण्यात असते. तिच्यावर काही मुले दबाव आणत होती, मारहाण आणि अत्याचार करत होती. तिने आधी पोलिसांना संपर्क केला होता; मात्र पोलिसांनी वेळेवर प्रतिसाद न दिल्याने तिने व तिच्या आईने माझ्याशी संपर्क साधला. मी आमच्या सहकाऱ्यांना तिच्या संरक्षणासाठी पाठवले.”
कोणतीही हाणामारी नाही
“ते मुले आमच्या सहकाऱ्यांच्या अंगावर धावून जात असताना मी स्वतः तिथे पोहोचलो आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. ‘हे प्रकरण थांबवा आणि निघून जा’ एवढेच मी तिथे बोललो. याबाबत पोलिसांत अधिकृत ‘एनसी’ (NC) नोंदवण्यात आली आहे. एका असहाय्य भगिनीला मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.”
माझी नार्को टेस्ट करा; पण पुण्यात रात्री 2 वाजेपर्यंत बार कसे चालतात, फडणवीसांनी उत्तर द्यावे!
दारू पिऊन धिंगाणा घातल्याच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना मोरे म्हणाले, “मी मद्यपान केले होते किंवा माझ्या रक्तात काही आढळले, असा संशय असेल तर माझी आत्ताच्या आत्ता नार्को टेस्ट आणि ब्लड टेस्ट करा. मी कोणत्याही वैद्यकीय तपासणीला सामोरे जाण्यास 100 टक्के तयार आहे. उलट, त्या त्रास देणाऱ्या मुलांची तपासणी करा, त्यांच्यात ड्रग्ज आढळतील.”
गृहखात्यावर निशाणा
“पुण्यात नाईट लाईफ आणि मद्यधुंद धिंगाणा सुरू असल्याचा कांगावा करणाऱ्या नवनाथ बन यांनी आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांना जाब विचारावा. पुण्यात रात्री दोन-दोन आणि चार-चार वाजेपर्यंत पब व बार कोणाच्या आशीर्वादाने सुरू राहतात? महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ कोणाच्या काळात झाला? याचे उत्तर आधी भाजप नेत्यांनी द्यावे.”
‘दृश्यम’ स्टाइलचा आरोप फेटाळला; अब्रुनुकसानीच्या दाव्याची तयारी
भाजपने केलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटासारख्या स्क्रिप्टच्या आरोपावर मोरे म्हणाले, “कायदा हातात घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही स्वतः पोलिसात कायदेशीर तक्रार दिली होती. विद्यार्थी आंदोलन फोडता येत नाही आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत म्हणून भाजप अशा क्लृप्त्या शोधत आहे. यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढला तेव्हा माझा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला होता.”
“माझ्यावर चारित्र्यहनन करणारे आणि तथ्यहीन आरोप करणाऱ्या नवनाथ बन यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर कोर्टात मानहानीचा खटला भरणार आहे. विद्यार्थ्यांनी या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, आमचा हा लढा अखेरपर्यंत सुरूच राहील,” असा ठाम निर्धार शिवराज मोरे यांनी शेवटी व्यक्त केला.
———————————————
हेही वाचा…
रोहित पवारांच्या आंदोलनात 80% गुंड!:नवनाथ बन यांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’ टाकून खळबळजनक आरोप; दिवसभर आंदोलनात, मध्यरात्री दारू पिऊन मुलीवरून राडे

“पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला हा शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ 20 टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित 80 टक्के हे बारामती ॲग्रोचे कर्मचारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि रोहित पवारांचे गुंड आहेत. हे कार्यकर्ते दिवसभर आंदोलनाच्या मंचावर बसून भाषणे ठोकतात आणि मध्यरात्री पुण्याच्या रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत नाइट लाइफ एन्जॉय करत मुलींवरून राडे घालतात,” असा खळबळजनक ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडत भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवार आणि त्यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी