Headlines

मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी पुण्यात उपाययोजनांवर चर्चा:सरकारसोबत संघर्ष करून शाश्वत विकासासाठी अल्प-दीर्घकालीन उपाय सुचवणार




मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच दाहक आहे. त्यामुळे या भागातून दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी सरकार व समाजासोबत राहून अल्प व दीर्घकालीन उपाययोजना सुचवू व त्या राबविण्यासाठी प्रसंगी संघर्षही करु, अशी भुमिका एस एम जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे यांनी जाहीर केली. एस एम जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन व मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्यावतीने पुण्यातील एस एस जोशी फाउंडेशनमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचविण्यासाठी मराठवाड्यातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वारे बोलत होते. मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू, फाऊंडेशनचे सचिव व ज्येष्ठ नेते साथी सुभाष लोमटे, पाणी प्रश्नाचे अभ्यासक व अभियंते दि. मा. मोरे, उपेंद्र टण्णू, रविंद्र धनक, संदीप बर्वे, युनिक फाऊंडेशनचे संचालक विवेक घोटाळे, प्रा ओमप्रकाश कलमे, मच्छिंद्र गोजमे, मोहन वाडेकर, ॲड वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, निरज धुमाळ आदी उपस्थित होते. प्रा. वारे यांनी यंदाच्या दुष्काळाची दाहकता विषद करताना यंदा मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होण्याची भिती व्यक्त केली. ते टाळण्यासाठी शासनाच्या तुटपुंज्या उपायांनी काहीही होणार नसून धाडसी उपाययोजना आखाव्या लागतील असे मत मांडले. महाराष्ट्रात यंदा अनेक वर्षांनंतर मोठ्या दुष्काळाला सामोरा जात आहे. प्रथमच २६५ एवढ्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारापाणी, रोजगार या तात्कालिक संकटांबरोबरच शेती व उद्योगांसमोरील मोठे संकट उभे ठाकले आहे, असेही त्यांनी सांगितले. दि. मा मोरे यांनी आपली भुमिका मांडत प्रचंड पाणी वापरणारे ऊस पीक लागवड व दुष्काळग्रस्त भागात साखर कारखान्यांवर बंदी घालण्याची मागणी केली.शासन हा निर्णय कधीच घेणार नाही. तो घ्यायला आपण रस्त्यावर उतरून तो घ्यायला लावून शकू का,तसेच मुलभूत प्रश्नांना भिडण्याची आपली तयारी आहे का,असा सवालही उपस्थित केला.विवेक घोटाळे यांनी स्थलांतरितांसाठी शहरांत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी केली. ॲड संतोष म्हस्के यांनी रोजगार हमी योजनेचे स्वरूप बदलण्याची गरज अधोरेखित केली.सतीश देशमुख यांनी जी- रामजी योजनेच्या अटी शिथील करण्याची मागणी केली.जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्त्या नीलम पंडित यांनी या विषयाकडे नकारात्मक न बघता सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहन करत दुष्काळाला भिडण्यासाठी कार्यकर्त्यांचे तीन चार दिवसांचे प्रशिक्षण घेण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गाव जलसाक्षर करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करावेत. प्रत्येक गावातच रोजगार व शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *