Headlines

महाज्योतीच्या परीक्षा गोंधळावर अतुल सावे यांचा खुलासा:‘तांत्रिक दोष आढळल्यास परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्ट करू’




महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान आंबेगाव येथील एका परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे सुमारे 40 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या प्रकारावर मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण देत, संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तपासात संबंधित परीक्षा केंद्राचा निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास ते केंद्र ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला. महाज्योतीच्या परीक्षांमध्ये वारंवार अडचणी येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी परीक्षेतील गोंधळ हा मानवी दोष नसून तांत्रिक अडचणीमुळे झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात आज जवळपास 1 ते 1.25 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. त्यापैकी आंबेगाव येथील एका कॉम्प्युटर हबमध्ये सुमारे 150 विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यातील जवळपास 40 विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरला परीक्षा सुरू करण्यासाठी आवश्यक लिंक कनेक्ट झाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही. या प्रकाराची तातडीने दखल घेण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले. तसेच महाज्योतीच्या एमडींना घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोष आढळल्यास परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्ट परीक्षा केंद्रावर मानवी निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल, असे सावे यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी अशा केंद्रांना ब्लॅकलिस्ट केले जाणार का, असा सवाल केला असता त्यांनी ‘100 टक्के करू’ असे उत्तर दिले. मात्र, नेमका दोष काय आहे, याचा अहवाल आल्यानंतरच अंतिम कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावे म्हणाले की, संबंधित केंद्रावर इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. केवळ एका विशिष्ट कॉम्प्युटर हबमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे हा प्रकार तांत्रिक दोषामुळे घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. महाज्योतीचे अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर घटनास्थळी गेले असून, त्यांच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल. ‘महाज्योतीच्या परीक्षा पारदर्शक’ महाज्योतीच्या परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतल्या जात असल्याचा दावा अतुल सावे यांनी केला. गेल्या पाच वर्षांपासून महाज्योतीशी संबंधित काम पाहत असल्याचे सांगत त्यांनी आतापर्यंत जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षा घेण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी अशा प्रकारची अडचण निर्माण झाल्याचे आपल्या निदर्शनास आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी अमान्य विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा बंद करून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी होत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन घेणे व्यवहार्य नसल्याचे सावे यांनी सांगितले. ‘एक लाख, दीड लाख किंवा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेणे शक्य नाही. ऑनलाइन पद्धतीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे सोपे होते आणि त्यात पारदर्शकताही राखता येते,’ असे त्यांनी स्पष्ट केले. शिष्यवृत्तीच्या पैशांवरही सावे यांचे स्पष्टीकरण दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या पैशांबाबत केलेले आरोप बेसलेस असल्याचे अतुल सावे यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम थेट DBTच्या माध्यमातून जमा केली जाते. काही वेळा बँकिंगशी संबंधित कारणे किंवा KYC पूर्ण नसल्यामुळे आठ-दहा दिवसांचा विलंब होऊ शकतो; मात्र विद्यार्थ्यांचे पैसे थांबवले जात नाहीत, असा दावा त्यांनी केला. शिष्यवृत्तीची रक्कम दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. काही प्रकरणांमध्ये आठ ते पंधरा दिवसांचा पुढे-मागे फरक पडू शकतो, मात्र पैसे थांबवले जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘राजीनामा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांच्या मूळ प्रश्नांऐवजी काही नेत्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुढे आणला जात असल्याबाबत विचारले असता सावे यांनी आपल्या विभागाने मागील तीन वर्षांत अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचा दावा केला. हॉस्टेल, शिष्यवृत्ती, परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसह ओबीसी विद्यार्थ्यांशी संबंधित विविध विषयांमध्ये लक्ष घालून व्यवस्था अधिक सुरळीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘जर ही सगळी चांगली कामे केली असतील, तर माझा राजीनामा मागणाऱ्यांनी थोडे स्वतःचे आत्मपरीक्षण करावे,’ असे सावे म्हणाले. तसेच आपल्या विभागाच्या सर्व योजना व्यवस्थितपणे राबविल्या जात असून, काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तरी त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… ‘नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे’:कोरेगाव पार्क प्रकरणातील तरुणीची भूमिका, ‘शिवराज मोरे यांनी मला मदत केली’ एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या कथित राड्याच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत कथित घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात आता संबंधित तरुणीने स्वतः पुढे येत नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. ‘मला त्रास आणि धमकावले जात असल्याने मी शिवराज मोरे यांची मदत घेतली. ते माझ्या मदतीसाठी आले,’ असे तरुणीने सांगितले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *