![]()
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त लावून जबरदस्तीने सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणे हे लोकशाही मानणाऱ्या देशात अजिबात योग्य नसून, लोकांवर लादलेल्या या दडपशाहीची किंमत सरकारला निश्चितपणे मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जयंत पाटील म्हणाले, सरकारला हे करण्याची गरज का पडते, शेतकऱ्यांसोबत संवाद का साधत नाहीत? सरकार वन साइड रेटारेटी करून सर्व करत आहे. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होण्यास मदत होते. त्याची किंमत सरकारमध्ये बसलेल्या सगळ्यांना मोजावी लागेल. तसेच ज्या भागातून शक्तिपीठ महामार्ग जातो त्या भागातील लोकप्रतिनिधींना देखील याची किंमत मोजावी लागेल. विकासकामाला आमचा विरोध नाही. मात्र, आधीपासूनच त्या ठिकाणी व्यवस्था असताना नवी व्यवस्था करणे हे योग्य नसल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सरकारमध्ये आधीच पैसे नाहीत, लाडक्या बहिणींचे पैसे तटवले जातात. लाखभर कोटी रुपयांची बिल थकीत आहेत आणि त्यात आपण लाखभर कोटी रुपयांचा रस्ता केला जातो. त्यामुळे लोक आश्चर्याने बघायला लागले. एकीकडे पैसे नाही असे सांगितले जाते आणि दुसरीकडे एक लाख कोटी रुपयांचा रस्ता हे विचित्र आहे. लोकांची सहमती असेल तर जरूर करा, मात्र जर लोक विरोध करत असतील तर ते होऊ नये. सैन्य आणल्यासारखे पोलीस आणायचे आणि लोकांची गळचेपी करायची हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे काही काळ सहन करतील पण त्याचा परिणाम भविष्यात दिसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, शरद लाड यांच्या उमेदवारीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, शरद लाड यांना जाताना मी सांगितले होते जाऊ नका. भारतीय जनता पार्टी तुम्हाला तिकीट देणार नाही हे मी सांगितले होते. दोन दिवसात तुम्हाला तिकीट नाही दिले, तर तुम्ही काय करणार हे मी बोललो होतो. दुर्दैवाने मी म्हणत होतो तसेच झाले आहे. लाडांऐवजी भाजपमधल्या निष्ठावंताला तिकीट मिळाले असते तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला असता. शरद लाड हे बाहेरून आले म्हणून त्यांना विरोध केला, मग भाजपने त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडला असता तर त्याच स्वागत झाले असते, पण तशी परिस्थिती दिसत नाही. शरद लाड हे तिकिटाच्या अशाने आत मध्ये गेले मात्र त्यांना तिकीटच दिले नाही. सत्तेत असणारे आश्वासन देत असतात आणि लोकही त्याला भुलत असतात. यांच्यासारखा अनुभव अनेक जणांना आला.
Source link
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त!:दडपशाहीची किंमत सरकारला मोजावी लागेल, जयंत पाटलांचा इशारा