![]()
मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मातेचा नवरात्रोत्सव येत्या ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजता मंदिरातील सभागृहात वैजापूरचे तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. उत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था व भाविकांची सोय यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना उत्सव काळात २४ तास अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता व शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोवीस तास सोय उपलब्ध करून द्यावी, असे संकेत दिले. तसेच अवैध दारू विक्रीवर कडक अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला कारवाईचे निर्देश देण्यात आले. संपूर्ण राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने सर्व विभागांनी अतिशय सतर्कतेने काम करावे आणि परंपरेनुसार उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, असे आवाहन सावंत यांनी केले. तहसीलदार सावंत यांनी मंदिर कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन, उत्सव काळात पूर्ण वेळ मंदिरात उपस्थित राहून भाविकांना सहकार्य करण्याचे कडक आदेश दिले. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नदीपात्रातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला गटविकास अधिकारी डी. ए. जायभाये, तालुका आरोग्य अधिकारी एन. जी. सावरगावकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बाळासाहेब नवले, आगारप्रमुख गोपाळ पगारे, विस्तार अधिकारी आर. एल. राठोड, मंडळ अधिकारी विभुते, तलाठी प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा भारद्वाज, मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, सहाय्यक व्यवस्थापक संतोष शेलार, आदीनाथ वाघुडे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंज यांनी मानले. यंदाही दर्शन रांगेतील भाविकांनाच मिळणार आरतीचा मान दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी एप्रिलमधील यात्रा आणि नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येतात. मागील दोन वर्षांपासून तहसीलदार सुनील सावंत यांनी मंदिर प्रशासनात पारदर्शकता आणत ‘दर्शन रांगेतील सामान्य भाविकांनाच आरतीचा मान’ देण्याची विशेष संकल्पना सुरू केली आहे. यंदाही हीच परंपरा कायम राहणार आहे. याशिवाय, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था उभारली जात आहे. दिवाळीत गरजू महिलांना देवीच्या साड्यांचे वाटप आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी मंदिरातील खोली उपलब्ध करून देण्यासारखे अनेक सामाजिक उपक्रम मंदिर प्रशासनातर्फे राबवले जात आहेत.
Source link
नवरात्रोत्सवात 24 तास वीज, स्वच्छता, शुद्ध पाण्याची व्यवस्था-सुरक्षेवर लक्ष:दाक्षायणी मातेचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून आढावा बैठक