![]()
माजी पोलिस सहायक निरीक्षक सचिन वाझे हे मर्सिडीजमधून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातो तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो कसा? अशी विचारणा करून मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गुरुवारी आश्चर्य व्यक्त केले. वाझे हे २०२१ मधील ‘अँटिलिया’ स्फोटके प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. पोलिस गणवेशातील व्यक्तीवर एखाद्या गुन्ह्याचा आरोप होतो, तेव्हा त्याचा प्रामाणिकता आणि वर्तन यांसारख्या अनेक बाजूंचा सखोल विचार करणे गरजेचे असते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी सचिन वाझे यांना मंजूर केलेल्या जामिनाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात या जामीन आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे वाझे सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहातच आहेत. गुरुवारी एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवले. वाझे हे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या अतिशय महागड्या गाड्या वापरत असत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर न्यायालयाने लगेच प्रश्न उपस्थित केला. “एक सहाय्यक पोलीस निरीक्षकदर्जाचा अधिकारी अशा महागड्या गाड्यांमधून कसा काय फिरू शकतो?’ खंडपीठाने नमूद केले, ही व्यक्ती एपीआय पदावर कार्यरत होती. तरीही ती थेट पोलीस आयुक्तांच्या इमारतीतील आपल्या कार्यालयात मर्सिडीजने येत असे. इतकेच नव्हे, तर ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठीही त्यांनी याच मर्सिडीज गाडीचा वापर केला. प्रकरण काय? २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील ‘अंटिलिया’ या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एक गाडी सापडली होती. ही गाडी ज्यांच्या ताब्यात होती. ते व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील खाडीत आढळून आला होता. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीत जिलेटीनच्या काड्या होत्या. त्या वाझे यांनी नेमक्या कुठून विकत घेतल्या, याची काही माहिती एनआयएला आहे का, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. हॉटेल ओबेरॉयमध्ये १०० दिवसांची खोली बुक कशी? वाझे यांच्या ओबेरॉय हॉटेलमधील तीन महिन्यांहून अधिक काळाच्या मुक्कामावरही कोर्टाने बोट ठेवले. “त्यांनी ओबेरॉय हॉटेलमध्ये तब्बल १०० दिवस खोली कशी काय बुक केली? एपीआयच्या पगारात हे सर्व शक्य आहे का? ” असा सवाल न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी केला. हे सर्व प्रकार वाझेंवरील वसुलीच्या आरोपांशीच जोडलेले आहेत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
Source link
अँटिलियाप्रकरणी सुनावणीवेळी उच्च न्यायालयास आश्चर्य:एपीआय सचिन वाझे मर्सिडीजमधून फिरतो, फाइव्हस्टारमध्ये राहतो कसा?- हायकोर्ट