Headlines

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक- पोलिस प्रमुख:गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते गौरव‎




आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी. तसेच या यशाकडे जाताना ज्यांनी आपली साथ दिली त्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नये, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे सुदर्शन बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, प्रकाश गांधी, सुनंदा भालेराव, ॲड. गौरव मिरीकर उपस्थित होते. रहदारीचे नियम, कायदा व सुव्यवस्था यांबद्दल फक्त पोलिसांची भूमिका नसून विद्यार्थ्यांची देखील भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबद्दल जागृत करणे आवश्‍यक आहे असे सुदर्शन यांनी यावेळी सांगितले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत जवळपास १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांना याबद्दल जागृत केले तर अहिल्यानगर हे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत निश्‍चितच आघाडीवर असेल. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या मायाजालापासून व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक छाया फिरोदिया यांनी केले. स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवून संस्थेच्या शाळांना प्रगतीपथावर नेले. शैक्षणिक, कला, क्रीडा धोरणांना चालना दिली. त्यांच्या ध्येयधोरणाने संस्था यशस्वी शैक्षणिक वाटचाल करत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक परशुराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य कैलास साबळे यांनी करून दिला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वैभव वाघ, स्नेहल झांबरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनो मोबाइलपासून दूर राहा : सुदर्शन विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या मायाजालापासून व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्लाही जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *