“पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुकारलेले आंदोलन हे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहे. त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे. आंदोलने होतात तेव्हा प्रशासन आणि सरकार विरोध करणारच, हे गृहीत
.
चंद्रपूर दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलन, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची दाहकता आणि अहिल्यानगरमधील 1200 एकर शासकीय जमिनीच्या वाटपावरून सत्ताधारी व विरोधकांना एकाच वेळी धारेवर धरले.
आंदोलनाला सरकार विरोध करणारच; रोहित पवारांचा हेतू चांगला
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आंदोलनकर्त्यांना नेहमी वाटते की सरकार आपल्याला नाहक त्रास देत आहे. परंतु व्यवस्थेचा इतिहास पाहिला तर सरकार आणि प्रशासन आंदोलनाला विरोध करणारच, हे आधीच समजून घेतले पाहिजे. त्या विरोधाला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवूनच आंदोलन लढावे लागते.”
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न
“रोहित पवारांनी जे आंदोलन उभे केले आहे, ते राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या करिअरसाठी आणि भविष्यासाठी आहे. त्यांचा हेतू 100 टक्के चांगला आहे. त्यामुळे सरकारने यात कोणताही राजकीय आकस न ठेवता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलली पाहिजेत.”
शेतकरी आत्महत्या एका वर्षाच्या दुष्काळाने नव्हे, तर 60 वर्षांच्या लुटीमुळे!
विदर्भातील वर्धा, भंडारा आणि इतर जिल्ह्यांत सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला. “केवळ चालू वर्षातील दुष्काळामुळे किंवा पावसाच्या खंडामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे मानणे चूक आहे. एका दिवसात किंवा एका वर्षात झाड कधी सुकत नाही. गेल्या 20, 25, 50 ते 60 वर्षांत आलेल्या सर्वपक्षीय सरकारांच्या चुकीच्या शेतीधोरणांमुळे शेतकऱ्यांची जी अखंड लूट झाली, त्याचे हे भयंकर परिणाम आहेत.”
कायमस्वरूपी धोरणाची गरज
“शासनाने जुजबी पंचनामे आणि तुकड्या-तुकड्यांत मदत देण्यापेक्षा शेतकऱ्याला कायमस्वरूपी दिलासा देणारा, शेतीमालाला हमीभाव देणारा आणि कर्जाच्या विळख्यातून कायमची मुक्ती देणारा ठोस व मजबूत कार्यक्रम तातडीने राबवला पाहिजे.”
शेतकऱ्यांना 50 एकरांचे सीलिंग, मग नेते-उद्योगपतींना हजारो एकर का?
अहिल्यानगरमधील शेती महामंडळाची 1200 एकर जमीन सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यावरून सुरू असलेल्या वादावर कडू यांनी थेट व्यवस्थेलाच आव्हान दिले. “आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीनंतर या देशात जमिनींवर सीलिंगचा कायदा आला. शेतकऱ्याला 50 एकरांपेक्षा जास्त जमीन बाळगता येत नाही; शेतकऱ्याच्या जमिनीवर लगेच सीलिंग लावले जाते. मग बड्या नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांच्या नावावर 1200-1500 एकर जमिनी कशा दिल्या जातात? सीलिंगचा कायदा काय फक्त गरीब शेतकऱ्यांसाठीच बनवला आहे का?”
अंबानी-अदानींवरही मर्यादा आणा
“जर शेतकऱ्यांवर जमिनीची मर्यादा आहे, तर अदानी, अंबानी आणि राजकीय नेत्यांच्या कंपन्यांवरही जमिनींचे सीलिंग लादले गेले पाहिजे. गरिबांच्या जमिनी हिरावून कॉर्पोरेट्सच्या आणि राजकीय नेत्यांच्या घशात घालण्याचे हे धोरण अत्यंत घातक आहे,” असा परखड इशारा बच्चू कडू यांनी दिला.
———————————————
हेही वाचा…
स्वतःच्या ‘रीलॉन्चिंग’साठी निष्पापांचा वापर!:MPSC आंदोलनावरून शिवेंद्रराजेंची टीका, विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांवर विरोधकांचे राजकीय गिधाडपण

“पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससीच्या (MPSC) आंदोलनात सध्या दोन परस्परविरोधी अजेंडे कार्यरत आहेत. एकीकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आणि न्याय्य आहेत; तर दुसरीकडे राजकीय अस्तित्वासाठी धडपडणारे नेते या निष्पाप विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची पोळी भाजत आहेत. अजितदादा पवार यांच्यानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आणि आपला डबघाईला आलेला पक्ष पुन्हा ‘रीलॉन्च’ करण्यासाठी काही नेते या आंदोलनाचा वापर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहेत,” असा परखड आणि जोरदार हल्लाबोल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनाचे स्वरूप, विरोधकांची राजकीय स्टंटबाजी आणि राज्य शासनाची भूमिका यावर अत्यंत सविस्तर व रोखठोक भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी