Headlines

NDRF जवानांसाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’ सुरू:कुटुंबीयांनाही मिळणार 24 तास मानसिक आरोग्य सेवा; तणाव आणि सामाजिक कलंक दूर करण्यावर भर




आपत्तीच्या काळात जीव धोक्यात घालून बचावकार्य करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आरोग्यविषयक मदत मिळावी, यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन (एनडब्ल्यूडब्ल्यूए) आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘एम्पॉवर’ या मानसिक आरोग्य सेवा संस्थेमध्ये याबाबत सामंजस्य करार झाला आहे. देशभरातील जवानांसाठी समुपदेशन, मानसिक आरोग्य तपासणी आणि संकटाच्या काळात तातडीची मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आपत्तीच्या ठिकाणी दीर्घकाळ काम करणे, जीवितहानीचे प्रसंग अनुभवणे, शारीरिक आव्हाने आणि अचानक होणारी तैनाती यांमुळे जवानांवर मानसिक तणाव येतो. या तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासोबतच मानसिक आरोग्याबाबतची भीती आणि सामाजिक कलंक दूर करण्यावर ‘प्रोजेक्ट निर्मल’मध्ये भर दिला जाणार आहे. बहुभाषिक हेल्पलाइन चोवीस तास सुरू या उपक्रमांतर्गत मानसिक आरोग्यविषयक जनजागृती सत्रे, नियमित तपासणी, वैयक्तिक आणि समूह समुपदेशन, दूरध्वनीद्वारे समुपदेशन, संकटाच्या प्रसंगी तातडीची मदत आणि आत्महत्या प्रतिबंधक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशभरातील प्रमुख प्रादेशिक केंद्रांमध्ये तज्ज्ञांची पथके कार्यरत केली जातील. तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञांद्वारे चालवली जाणारी बहुभाषिक हेल्पलाइन चोवीस तास सुरू राहणार आहे. जवानांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही या सेवांचा लाभ घेता येईल. एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्षा प्रीती आनंद यांनी जवानांचे मनोबल, कार्यसज्जता आणि बचावकार्याची परिणामकारकता टिकवण्यासाठी त्यांच्या भावनिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि ‘एम्पॉवर’च्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी, देशाची सेवा करणाऱ्या जवानांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे नमूद केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस दलासोबत मानसिक आरोग्यविषयक कामाचा अनुभव या उपक्रमासाठी उपयोगी ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *