![]()
कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा पिशोर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि चांदीचा मोदक असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेशपूर येथील गणपती मंदिरात २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि समोरील चांदीचा मोदक चोरून नेला होता. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३६/२०२६ दाखल करण्यात आला होता. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शाम गवळी, दत्तात्रय मोरे, कैलास करवंदे, फिरोज बरडे, सुनील भिवसणे, कौतिक सपकाळ, पवन खंबाट, साई घुगे, करण म्हस्के, गणेश कवाळ, सायबर शाखेचे योगेश तरमाळे तसेच शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहायक फौजदार इरफान शेख यांनी केली. सलग चार दिवस केले तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी शिर्डी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. शिर्डीतून भगवानसिंग दिलीपसिंग परदेशी (रा. शिर्डी) आणि अनिल हिरालाल बेडवाल (रा. छत्रपती संभाजीनगर) दोघांना ७ ऑक्टोबरला अटक केली.
Source link
गणेशपूरच्या मंदिरातील चोरीचा छडा; 2 आरोपी जेरबंद, मुद्देमाल हस्तगत:पिशोर पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे चोरट्यांना शिर्डी येथून केली अटक