![]()
घाटणदेवी मातेच्या दर्शनासाठी यंदा सुमारे चार लाख भाविक येण्याचा अंदाज असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह त्यांना सुलभ आणि सुखकर दर्शन मिळावे, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी त्वरित दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत श्री जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी माहिती दिली. राज्यातून लाखो भाविक दरवर्षी घाटणदेवी मातेच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनासाठी विश्वस्त भारत साळी, ताराचंद भरिंडवाल, ओमप्रकाश तिवारी, राजेश गुप्ता, निलकमल रावत, नरेश गुप्ता, श्यामसुंदर पुरोहित व रामगोविंद यादव आदींचे सहकार्य लाभत आहे. घाटणदेवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना गर्दीत जास्त वेळ थांबावे लागू नये, यासाठी त्यांना त्वरित दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहताना ऊन आणि पावसाचा त्रास होऊ नये, यासाठी दर्शन रांगेत कापडी मांडव आणि ताडपत्रीची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य सुविधांसह ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे. याशिवाय इगतपुरी नगरपालिकेच्या वतीने अग्निशामक वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला भाविक व लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रा परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक राहावा, यासाठी कॅरिबॅग व प्लास्टिकमुक्त यात्रा उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येणार आहे. भाविकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून परिसरातील स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
नवरात्राेत्सव:घाटणदेवी मंदिर पहाटे 4 ते रात्री 12 पर्यंत राहणार खुले