![]()
सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने नवोदय विद्यालय समितीच्या अंतर्गत आयोजित २८ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत खेडगावच्या पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाने ८९.६० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील एकूण ७३ जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये आयोजित या स्पर्धेत खेडगाव विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जवाहर नवोदय विद्यालय मेहसाणा (गुजरात), जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली (महाराष्ट्र) आणि पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव, नाशिक या तीन विद्यालयांची निवड झाली होती. अंतिम फेरीत तिन्ही विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत संसदीय कार्यप्रणालीचे प्रभावी सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी लातूरचे माजी खासदार डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड, नवोदय विद्यालय समिती पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विश्वनाथ खिलार आणि पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगलीचे प्राचार्य श्री. गणपत मस्के यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी केलेल्या निष्पक्ष मूल्यमापनात खेडगाव विद्यालयाने सर्वोच्च ८९.६० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.या युवा संसद स्पर्धेत विद्यालयाच्या एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यप्रणालीतील विविध भूमिका आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे साकारल्या. अध्यक्ष म्हणून अमेय अहिरे, उपाध्यक्ष म्हणून मनस्वी गायकवाड, पंतप्रधान म्हणून पार्थ पवार, गृहमंत्री म्हणून साईराज काटकर, विज्ञान मंत्री म्हणून सोनवणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कल्पेश चौरे यांनी आपापल्या भूमिका समर्थपणे पार पाडल्या. या उल्लेखनीय यशासाठी प्राचार्य शिवरुद्र स्वामी, उपप्राचार्य बोऱ्हाडे व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.
Source link
राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत खेडगावच्या नवोदय विद्यालयाचा प्रथम क्रमांक:अंतिम फेरीत मेहसाणा आणि गडचिरोलीच्या विद्यालयांना मागे टाकले