Headlines

दुष्काळाचा फास:पालकमंत्र्यांकडे धानाची व्यथा मांडणाऱ्या 50 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या




हाता तोंडाशी आलेला घास दुष्काळाने हिरावून घेतल्याने एका 50 वर्षीय हतबल शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवल्याची सुन्न करणारी घटना धोप (ता. तुमसर, जि. भंडारा) येथे घडली आहे. राजेंद्र अमर सपाटे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी परिसराच्या पाहणीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांसमोर अश्रू ढाळत आपल्या करपलेल्या शेतीची व्यथा मांडली होती. 5 एकरांतील पीक जळाले; कर्जाचा डोंगर मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सपाटे यांच्याकडे सुमारे 5 एकर शेती आहे. मात्र, पावसाने मारलेल्या ओढीमुळे त्यांच्या शेतातील उभे धानपीक पूर्णपणे करपून गेले. वर्षाकाठी होणारे उत्पन्न बुडाल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत ते सतत वावरत होते. 3 ऑक्टोबरला पालकमंत्र्यांपुढे मांडली होती व्यथा भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे परिसरात आले होते. त्यावेळी राजेंद्र यांनी स्वतः पालकमंत्र्यांची भेट घेऊन करपलेले धान दाखवले होते आणि तातडीने मदत देऊन भाग दुष्काळग्रस्त घोषित करण्याची विनंती केली होती. मात्र, गुरुवारी (ता. 8) सकाळी त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दरम्यान, तुमसर आणि मोहाडी हे दोन्ही तालुके शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळले गेल्याने या भागातील शेतकरी वर्ग कमालीचा आक्रमक झाला आहे. तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *