![]()
अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात एकापाठोपाठ एक तीन गाड्या नादुरुस्त झाल्याने घाटात तीन तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, फर्दापूर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची दुरुस्ती व वाहतुकीचे योग्य नियोजन करून रस्ता ३ तासांत पूर्ववत केला. जळगावकडून संभाजीनगरच्या दिशेने जाणारा एक मालवाहतूक ट्रक घाटातील घोडी पटांगण मैदानाजवळ शनिवारी रात्री अचानक बंद पडला. या पाठोपाठ काही वेळातच एक आयशर टेम्पो आणि एक पिकअप व्हॅनही परिसरात नादुरुस्त झाली. रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी तीन वाहने बंद पडल्यामुळे घाटात दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस कॉन्स्टेबल फिरोज तडवी, दीपक घन, संदीप बिरारे आणि भास्कर गव्हाडे यांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक तंत्रज्ञांच्या मदतीने नादुरुस्त वाहनांची कामे करून घेतली. अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या अशा प्रकारे रांगा लागल्या होत्या. ८ महिन्यांत १२ वेळा घाटात वाहतूक ठप्प घाटात १६ मार्च ते १० ऑक्टोबर या ८ महिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने १२ वेळा वाहतूक कोंडी झाली आहे. घाटातील रस्ता नागमोडी, अरुंद आहे. वळणांवर वाहनांना वळण्यासाठी जास्त जागा लागते. अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्याने ते चढ आल्यावर बिघाडामुळे बंद पडतात.
Source link
अजिंठा घाटात 3 वाहने बंद; 3 तास वाहतूक ठप्प:घोडी पटांगण येथे शनिवारी रात्री 11.30 वाजेची घटना