![]()
नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्रमुख देवी मंदिरांसह गावोगावी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर रविवारी ( ११) सकाळी ११ वाजता घटस्थापना होणार असून, नऊ दिवसांच्या उत्सवासाठी गड सज्ज झाला आहे. माहूरहू
.
मोहटादेवी गडावर श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते घटस्थापना होईल. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही आणि बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुका माता देवस्थानात माहूरहून येणाऱ्या ज्योतीचे रविवारी दुपारपर्यंत आगमन होण्याचे नियोजन आहे. महापूजा, शतचंडी याग आणि घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होईल. शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथे ११ ते १७ ऑक्टोबरदरम्यान जगदंबा माता नवरात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन आणि कीर्तन महोत्सव होईल. जिल्ह्यातील देवी मंदिरांत घटस्थापनेनंतर नऊ दिवस भक्ती, उपासना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
श्रीक्षेत्र मोहटादेवी गड आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. छाया : राजेंद्र भंडारी.
भाविनिमगावात खडी नवरात्र उभे राहून देवीची आराधना भावीनिमगाव येथे नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या उपासनेसाठी काही भाविक खडी नवरात्र व्रत करतात. या व्रतात भाविक झोपून विश्रांती न घेता उभे राहून किंवा जागे राहून देवीची आराधना करण्याचा संकल्प करतात. या व्रताचे स्वरूप आणि नियम भाविकांच्या परंपरेनुसार वेगवेगळे असू शकतात. भाविनिमगाव येथे अशा व्रतस्थ भाविकांच्या रात्रीच्या विश्रांतीसाठी चौफळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.