![]()
राज्याचे महसूल मंत्री, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेने निषेध केला. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक कटके यांना भाजप शहर जिल्ह्यातर्फे निवेदन दिले. भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, महापौर श्रीचंदजी तेजवानी, भाजप विदर्भ विभाग संयोजक प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपच्या निवेदनानुसार समाज माध्यमात प्रसारित एका व्हिडिओमध्ये आमदार नितीन देशमुख हे बाळापूर येथील एका शासकीय कार्यालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात बोलताना पदाची प्रतिष्ठा, सार्वजनिक सभ्यता आणि लोकशाहीतील परस्पर आदर यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. महसूल मंत्री म्हणून बावनकुळे यांनी महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत जबाबदार लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या वक्तव्यांबाबत योग्य ती काळजी राखली जाणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन देशमुख यांचे वक्तव्य हे अयोग्य आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सत्यता तपासावी आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. आंदोलनात भाजप नेते किरण पातुरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, मनपा सभागृह नेते चेतन गावंडे, शहर जिल्हा महामंत्री बादल कुळकर्णी, चेतन पवार, महिला मोर्चा अध्यक्ष सुधा तिवारी, कुणाल टिकले, माजी महापौर संजय नरवणे,नगरसेवक सुरेखा लुंगारे, इतर पदाधिकारी राजेश आखेगावकर, अमित कुळवंत, महेंद्र रावेकर, राजेंद्र तांबेकर, गजानन गायकवाड, रवी पारवे, आकाश तायडे, आशिष बजाज, निखिल घुरडे, अशोक पंचारे, अक्षय देशमुख, आकाश जाधव, शुभम खंडारकर, अंकेश वर्मा, अविनाश खंडारे, संदीप सहारे आदी सहभागी झाले होते.
Source link
पालकमंत्र्यांविरुद्धच्या वक्तव्याचा निषेध