![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेकडून आज राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची उपस्थिती या मोहिमेबाबत माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ठिकठिकाणी आणि प्रत्येक विभागात ही मोहीम राबवली जाईल. त्यानंतर संध्याकाळी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर या स्वाक्षरी मोहिमेचा मुख्य टप्पा पार पडेल. यासाठी स्वतः राजसाहेब ठाकरे उपस्थित राहतील आणि आपली स्वाक्षरी करतील.” ‘स्वाक्षरी मोहिमेला परवानगीची गरज नाही’ सध्या सुरू असलेल्या आंदोलनांवरील पोलिसांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोहिमेच्या परवानगीबाबत विचारले असता, मनसे नेत्यांनी ठाम भूमिका मांडली. “स्वाक्षरी मोहिमेसाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते. लोकशाहीमध्ये स्वाक्षरी करायला थोडीच बंदी आहे! तुम्ही आंदोलन आणि प्रोटेस्ट करायला बंदी घालू शकता, पण स्वाक्षरी मोहिमेला कसली बंदी घालणार?” असा सवाल मनसेच्या नेत्यांनी उपस्थित केला. “संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय” लोकशाही मार्गाने विरोध दर्शवण्यावर भर देत मनसे नेत्यांनी प्रशासनाला सूचक इशारा दिला. “स्वाक्षरी मोहीम आम्ही घेणारच. संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे,” अशी आक्रमक भूमिका मनसे प्रवक्त्यांनी मांडली. या मोहिमेच्या माध्यमातून मनसेने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सरकार आणि प्रशासनावरील दबाव आणखी वाढवण्याची रणनीती आखली आहे. हेही वाचा.. विजय वडेट्टीवारांचा ‘चलो दिल्ली’चा नारा:राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
देशात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सविस्तर वाचा विरोधकांचा आज CEC विरोधात SC पर्यंत मार्च: CJIचा राहुल-खरगेंना भेटण्यास नकार, दोघांनी मागितली होती वेळ; 6 मेट्रो स्टेशन बंद मतदानातील फेरफार किंवा मते चोरल्याच्या आरोपांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील इतर विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसने या आंदोलनाला ‘चलो दिल्ली – लोकशाहीसाठी मोर्चा’ (Chalo Delhi – March for Democracy) असे नाव दिले आहे. विरोधी पक्षांचे नेते दुपारी १:३० वाजता कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शन येथे एकत्र जमणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवेदन सादर करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्याकडे रविवारी भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी राहुल गांधी यांना भेटण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी असे सांगितले की अशाच प्रकारची प्रकरणे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सविस्तर वाचा
Source link
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक:आज राज्यभर स्वाक्षरी मोहीम, राज ठाकरे शिवाजी पार्कवर लावणार हजेरी