![]()
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या कडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक. डॉ. श्रेणिक लोढा यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वसंत आरसेवार आणि पोउपनि माधव जिव्हारे यांच्या तपास पथकाने सर्व गुन्ह्याची माहिती घेतली. या आधारे पथकाने संशयित शेख जुनेद शेख मैमुद्दीन (रा. लक्ष्मीनगर देगलूर नाका, नांदेड) आणि अब्दुल दानीश अब्दुल रफीक ( रा. बेबडा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी संशयीतांच्या अधिक चौकशीत त्यांनी इतर साथीदारांची नावे निष्पन्न केली, ज्यात शेख शाहीद शेख चांद (रा. खुबा कॉलनी, अर्धापूर), महंमद खाजा महंमद मिर (रा. नांदेड) आणि रिजवान उर्फ पुष्पा (रा. नांदेड हिंगोली) यांचा समावेश आहे. पोलिसांनी मुख्य आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमधून अनेक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत आरोपींकडून बजाज पल्सर कंपनीच्या ३ मोटारसायकल (किंमत रु. १,८५,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. मोहन भोसले, सपोनि वसंत आरसेवार, पोउपनि माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, शिवाजी जालमिर, हरिभाऊ गुंजकर, विशाल खंडागळे, मुनिर मुन्निवाले, आझम प्यारेवाले, ज्ञानेश्वर गोरे, किशोर सावंत आणि चालक पोलीस अंमलदार शंकर हराळ यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
Source link
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कारवाई:आंतरजिल्हा दुचाकी चोरटोळी गजाआड; 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त