Headlines

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाकपचा एल्गार:दुष्काळी अनुदानाची मागणी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतमजूर युनियनचा सहभाग‎




दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज, सोमवारी, नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महाराष्ट्र राज्य किसान सभा तसेच शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कामगार-कष्टकऱ्यांचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये दुष्काळी अनुदान तातडीने देण्यात यावे. शेतकरी, कष्टकरी जनतेला आर्थिक दिलासा द्यावा. भूमिहीन, शेतमजुरांना प्रति कुटुंब ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जातून महिलांसह इतर कर्जदारांना दिलासा मिळावा. बचत गटाचे कर्ज माफ व्हावे. सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. कृषी केंद्राची शेतकऱ्यांकडे असलेली देणी फेडण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष निधी द्यावा. श्रावणबाळ योजनेचे रखडलेले अनुदान त्वरीत द्यावे. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे अनुदान तात्काळ अदा करावे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी. सर्व शेती उत्पादनांसाठी हमीभावाचा कायदा करावा. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची प्रवेश फी माफ करावी. आदी मागण्या या निवेदनात नमूद आहेत. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेती उत्पादनावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीवरील खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाची परतफेड यांचा ताळमेळ घालताना शेतकरी, कष्टकरी जनतेची मोठी ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने मदत करून बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनामध्ये किसान सभेचे नेते ॲड. शिवाजीराव देशमुख, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सतीश चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजसे, सहसचिव विनोद तऱ्हेकर, बाजार समितीचे संचालक ओमप्रकाश सावळे, शेतमजुरांचे नेते नारायणराव भगवे यांच्यासह हरिदास देशमुख, हरिदास राजगिरे, जयाताई मंडवधरे, प्रतिक्षा ढोके, अरुणभाई शिंदे, इस्राईल शहा, विजय मंडवधरे, वासुदेव चौधरी, माधव ढोके, रविंद्र तलवारे, गेश अवझाडे, हनुमान शिंदे, वैष्णवी शिंदे, चित्राताई खंडारे, बाबारावजी इंगळे, अविनाश कणसे, योगेश कणसे, रामदास गायधनी, संतोष बागळे, सचिन मेटकर, ओंकार पाखरे, प्रशांत गुल्हाने, विजय ढोके, गजानन सुलताने, सदाशिव मेहेंगे, जानराव सोनोने, धनराज मेहेंगे, जानराव सोनोने, भीमराव काळमेघ आदी सहभागी झाले होते. मायक्रोफायनान्सच्या कर्जाचा मुद्दा ऐरणीवर शेतकरी, मजुरांनी शेती कामे, घरकुल बांधणी, इतर जीवनावश्यक बाबींसाठी मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले आहे. आता तेच कर्ज ग्रामीण कष्टकऱ्यांच्या गळ्याचा फास बनले आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर, दुष्काळामुळे घटलेले उत्पन्न, घटलेला रोजगार यामुळे या कर्जाची परतफेड करण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *