Headlines

'कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी पुरवा!':वेळापूरच्या पाणीप्रश्नावरून आमदार उत्तम जानकरांचा वीज अधिकाऱ्यांवर संताप




वेळापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही वीज कनेक्शन दिले जात नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी थेट वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना, “कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी पुरवा!” अशा शब्दांत सुनावले आहे. वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत, त्यांना स्वतःच्या घरातील घागरी आणून गावाला पाणी पुरवण्याचा आदेशच जानकर यांनी दिला आहे. सध्या अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढली असून पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत वेळापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला वीज कनेक्शन देण्यास वीज वितरण विभागाकडून मोठी दिरंगाई होत होती. विशेष म्हणजे, या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार उत्तम जानकर यांनी स्वतःच्या आमदार फंडातून ट्रान्सफॉर्मर आणि विजेची संपूर्ण लाईन उभी करून दिली होती. सर्व व्यवस्था करूनही वीज जोडणी न मिळाल्याने शहराचा पाणीप्रश्न रेंगाळला होता. आमदार उत्तम जानकरांचा अधिकाऱ्यांना जाब पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नावर अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे आमदार उत्तम जानकर यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करत ते म्हणाले, “तुमच्या घरातील घागरी आणा, अंगातील कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी द्या.” दुष्काळाच्या झळा बसत असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यातूनच आमदारांनी ही अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. अधिकाऱ्यांकडून तात्काळ वीज कनेक्शन जोडून देण्याचे आश्वासन आमदार जानकर यांनी घेतलेल्या या रोखठोक आणि आक्रमक पवित्र्यानंतर वीज वितरण विभागाचे अधिकारी ताळ्यावर आले. या सक्त ताकीदीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तात्काळ वीज कनेक्शन जोडून देण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढणाऱ्या आमदार उत्तम जानकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा.. पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची तयारी:विधानसभा प्रभारी जाहीर; दोन्ही मतदारसंघांत 4.50 लाख मतदारांसाठी 1,051 मतदान केंद्रे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार विधानसभा प्रभारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून पदवीधर निवडणुकीसाठी स्मिता जाधव तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *