Headlines

VIP वाहन खरेदीवरून अतुल लोंढेंची टीका:म्हणाले- बायकोचे मंगळसूत्र विकले तरी चालेल, पण स्वतःचे शौक पूर्ण करणार; हेच फडणवीस सरकारचे धोरण




“राज्यातील शेतकरी आज तीव्र दुष्काळाने होरपळत आहे, पदवीधर तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र कर्जाच्या प्रचंड डोंगराखाली दबला आहे. असे असताना राज्यकर्त्यांच्या दिमतीसाठी जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या खरेदी केल्या जात आहेत. ‘बायकोचे मंगळसूत्र विकायला लागले तरी चालेल, पण मी माझे शौक पूर्ण करणार’ अशाच विकृत मानसिकतेतून फडणवीस सरकारचा हा कारभार सुरू आहे. सरकारने या गाड्यांची खरेदी तत्काळ रद्द करून तो सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे वळवावा, अन्यथा जनतेचा संताप रस्त्यावर दिसेल आणि या गाड्या रस्त्यावर फोडल्याशिवाय राहणार नाहीत,” असा घणाघाती आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे यांनी राज्य सरकारच्या गाड्या खरेदीचा वाद, अकोल्यात फायनान्स कंपन्यांच्या वसुली गुंडांकडून महिलांचे काढण्यात आलेले फोटो, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर सुरू होणारा ‘शिवतांडव’ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. गाड्या रद्द करा, नाहीतर फोडू! शासनाकडून व्हीआयपी पाहुण्यांसाठी कोट्यवधींच्या आलिशान गाड्या खरेदी करण्याच्या निर्णयावर कडाडून टीका करताना अतुल लोंढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस केवळ मोठ्या मोठ्या गोष्टी आणि भाषणांपुरते मर्यादित आहेत. रेशन स्वतःच मटकावायचे आणि सामान्य जनतेला मात्र उपाशी मारायचे, असा हा प्रकार आहे. राज्याची तिजोरी रिकामी असताना सत्ताधाऱ्यांच्या दिमतीला कोट्यवधींच्या नव्या गाड्या कशासाठी हव्यात?” गाड्या रस्त्यावर फोडण्याचा इशारा “हा जनतेचा घाम आणि कराचा पैसा आहे. सरकारने ही उधळपट्टी तत्काळ थांबवून तो निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा. जर या गाड्या रस्त्यावर उतरल्या, तर संतप्त जनता त्या फोडल्याशिवाय राहणार नाही.” अकोल्यात महिलांचे फोटो काढणाऱ्या वसुली गुंडांना कुत्र्यासारखे बडवा अकोला जिल्ह्यात कर्जवसुलीसाठी आलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी महिलांच्या घराच्या दारात जाऊन त्यांचे फोटो काढल्याच्या गंभीर प्रकारावर लोंढे यांनी संताप व्यक्त केला. “हे सरकार कोणत्या खालच्या थराला गेले आहे, याचे हे विदारक चित्र आहे. सरकारने पोसलेले वसुलीबाज गुंड आता घराघरांपर्यंत पोहोचून माता-भगिनींचा अपमान करत आहेत. ज्याप्रमाणे पुण्या-मुंबईत तरुणांना मारहाण झाली, त्याच गुंडगिरीचे हे दुसरे रूप आहे.” जागीच चोप देण्याचे आवाहन “महाराष्ट्रातील माता-भगिनींना आणि नागरिकांना माझे जाहीर आवाहन आहे—अशा पद्धतीने कर्ज वसुलीच्या नावाखाली घराच्या दारात येऊन जर कोणी महिलांचे फोटो काढत असेल, तर अशा गुंडांना तिथेच पकडून कुत्र्यासारखे बडवून काढा! कोण गुन्हे दाखल करते ते आम्ही पाहू, संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.” लोकशाहीशी गद्दारी करणाऱ्यांना किंमत मोजावीच लागेल! नवी दिल्लीत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या आणि खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर लोंढे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आज संध्याकाळी 4 वाजता ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. आघाडीतील सर्व ज्येष्ठ नेते आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील.” संविधानाचा गळा घोटणाऱ्यांना इशारा “राहुल गांधींनी स्पष्ट म्हटले आहे की, हा लोकशाही रक्षणाचा ‘शिवतांडव’ आहे. या तांडवाच्या तडाख्यात कोण कोण येणार? अमित शहा, नरेंद्र मोदी की अजित डोवाल? ज्या ज्या लोकांनी देशाच्या संविधानाशी, लोकशाहीशी आणि सामान्य जनतेशी गद्दारी केली आहे, ज्यांनी संविधानिक संस्था संपवण्याचे पाप केले आहे, त्या प्रत्येकाला या शिवतांडवात मोठी किंमत मोजावीच लागेल.” नागपूर पदवीधरमध्ये अभिजित वंजारींचा विजय निश्चित विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. “भाजपने नागपूरमध्ये माजी महापौर अनिल सोले यांची बंडखोरी शमवून त्यांना बसवले असले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील निलेश कराळे यांच्या उमेदवारीसंदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाशी चर्चा करून समन्वय साधू.” सहा वर्षांच्या कामाची पोचपावती “गेल्या सहा वर्षांत आमदार अभिजित वंजारी यांनी पदवीधरांसाठी, बेरोजगारांसाठी उत्तम काम केले आहे. आज राज्यातील तरुण, पदवीधर आणि सामान्य जनता या महायुती सरकारला पूर्णपणे विटली आहे. त्यामुळे जनतेचा रोष मतपेटीतून व्यक्त होईल आणि नागपूर पदवीधरमधून अभिजित वंजारी पुन्हा प्रचंड बहुमताने विजयी होतील,” असा विश्वास अतुल लोंढे यांनी शेवटी व्यक्त केला. ————————————————— हेही वाचा… एकनाथ शिंदे नाराज झाले तर मोठा स्फोट होईल: सरकार बदलून जाईल, उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडूंचे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी मारलेली दांडी आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. याच चर्चेवर आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे साहेब नाराज नाहीत, पण ते जर नाराज झाले, तर थेट स्फोटच होईल आणि सरकार बदलून जाईल,” असं अत्यंत सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही फटकेबाजी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *