.

निफाड तालुक्यातील हिंगलाजनगर (खेडे) येथील हिंगलाज देवीमातेच्या दर्शनासाठी दररोज पहाटेपासून सुमारे २० हजार भाविकांची रीघ लागत आहे. नवरात्रोत्सवातील देवीमातेचा यात्रोत्सव बुधवारी (दि.१४) होत आहे.
हिंगलाज देवीमातेचे मूळ स्थान पाकिस्तान व बलुचिस्तान सीमेवरील हिंगला पर्वतावर असल्याचे सांगितले जाते. देवीमातेचे मूळ स्वरूप कुमारिका अवस्थेतील आहे. डोंगरपुरी नावाच्या भक्ताच्या श्रद्धेमुळे हिंगलाज माता खेडे येथे आल्याचे सांगितले जाते. विनता नदीच्या पुरामुळे देवीमातेला खेडे येथे स्थानापन्न व्हावे लागले, अशी आख्यायिका आहे. मूळ मंदिराची रचना हेमाडपंथी असून, ते इसवी सन १२२८ मधील आहे. मंदिरासमोर ११०० फूट अंतरावर डोंगरपुरी महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे.
श्री हिंगलाज माता देवीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ विधिवत पूजनाने झाला आहे. उत्सवकाळात दररोज त्रिकाल आरती व महापूजा होत आहे. हरिनाम सप्ताहांतर्गत दररोज सकाळी ६.३० वाजता देवीमातेची महापूजा, सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत दुर्गासप्तशती पाठपठण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६.४५ वाजता महाआरती आणि रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे. मंदिर भाविकांसाठी दररोज सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
गुरुवारी (दि. १५) अनिल महाराज दातार (कोठुरे), शुक्रवारी (दि. १६) किशोर महाराज खरात (सिन्नर), शनिवारी (दि. १७) ऋषिकेश महाराज चव्हाण (ठाणगाव), रविवारी (दि. १८) निवृत्ती महाराज रायते (खडक माळेगाव) यांचे कीर्तन होईल. सोमवारी (दि. १९) रात्री ८ ते १० या वेळेत पंडित महाराज कोल्हे यांचे काल्याचे कीर्तन होईल. मंगळवारी (दि. २०) सकाळी ९ ते १२ या वेळेत नवचंडी याग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.