![]()
येथील श्री बालाजी मंदिरातील नवरात्रोत्सवाची परंपरा सुमारे चारशे वर्षांपासून जपली जात आहे. तेलंगणा येथून आणलेल्या श्री बालाजीच्या पंचधातूच्या मूर्तींची स्थापना झाल्यापासून या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्राच्या दहा द
.
निजामशाहीच्या काळात सुमारे चारशे वर्षांपूर्वी तेलंगण येथील तेलंगी ब्राह्मणांनी तिरुपती येथून श्री बालाजीच्या पंचधातूच्या मूर्ती आणल्याची माहिती आहे. सुरुवातीला गावातील गोविंद सोनार यांच्या घरी या मूर्तींची स्थापना करण्यात आली. पुढे निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर मंदिरांचा कारभार भोसले घराण्याचे पंच सचिव आप्पाजी देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून देशमुख घराण्याचे वंशज मंदिराचे कामकाज पाहत आहेत. श्री बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंदिरातील नवरात्रोत्सवाची परंपरा आजही श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. या उत्सवामुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होत आहे.
दसऱ्याला सीमोल्लंघनाची परंपरा दसऱ्याच्या दिवशी श्री बालाजीची पालखी गावाबाहेर सीमोल्लंघनासाठी नेली जाते. मंदिरात परतल्यानंतर बालाजीला सोने अर्पण केले जाते. त्यानंतर ग्रामस्थ दसरा सण साजरा करतात. या परंपरेला धार्मिक महत्त्व असून, गावातील भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री बालाजीची हत्तीच्या प्रतीकात्मक वाहनावरून मिरवणूक काढली जाते. या वेळी हत्तीच्या वाहनावर गुलाल उधळला जातो. तसेच नारळ, पोहे, लाडू आणि अनारसे यांसारख्या प्रसादाचे ग्रामस्थांना वितरण केले जाते. या सोहळ्यामुळे उत्सवातील आनंद द्विगुणित होतो.
दहा दिवस विविध वाहनांवरून मिरवणूक नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत श्री बालाजीच्या विविध वाहनांची मिरवणूक काढली जाते. पहिल्या दिवशी नागाच्या वाहनावरून मिरवणूक निघते. त्यानंतर चक्र, मोर, वाघ, गरुड, हनुमान आणि पाळणा अशा विविध वाहनांचा समावेश असतो. दररोज रात्री नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होते. या वेळी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. मिरवणुकीदरम्यान गावातील वातावरण भक्तिमय होते. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव कुऱ्हा गावाच्या धार्मिक परंपरेचे वैशिष्ट्य मानला जातो.