![]()
भुकेल्या व्यक्तीला अन्नाची खरी किंमत आणि महत्त्व कळते, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा मृत्यू जवळ येतो, तेव्हाच मानवाला खऱ्या अर्थाने जीवनाची खरी किंमत कळते. राजा परीक्षिताप्रमाणेच आपण सर्वांनीही आपल्या आयुष्यातील उरलेला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणात घालवला पाहिजे. भागवत हा केवळ ग्रंथ नसून तो मानवाला मोक्ष देणारा मार्ग आहे, असे प्रतिपादन पलक किशोरी यांनी केले. गंगापूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी त्या निरूपण करताना बोलत होत्या. प्रारंभी कार्यक्रमाच्या आयोजिका सुवर्णा जाधव, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी भाविकांचे स्वागत केले. कथेच्या द्वितीय दिवशी शुकदेवजींचा जन्म, राजा परीक्षिताला शुकदेवजींचे झालेले आगमन आणि भागवत प्राप्ती या दिव्य प्रसंगांवर ओघवत्या शैलीत निरूपण केले. त्यांच्या निरूपणाने आणि सुमधुर भजनांनी गंगापूरनगरी भक्तिमय झाली आहे. पलक किशोरी यांनी भारतीय संस्कृतीतील महिलांच्या आदरावर आणि स्थानावर भर दिला. त्या म्हणाल्या, ज्या समाजात आणि कुटुंबात स्त्रीचा सन्मान केला जातो, तिथेच खऱ्या अर्थाने प्रगती, शांती आणि सुख-समृद्धी नांदते. नवरात्रीच्या पर्वात दुर्गामातेच्या रूपाप्रमाणेच प्रत्येक घरातील मुलीने व मातेने आपले अधिकार ओळखून समाजात नेतृत्व सिद्ध केले पाहिजे, असा संदेश देत त्यांनी महिलांनी विचारवंत बनण्याचे आवाहन केले. कथेच्या सुरुवातीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेचा, सोपान देशमुख आणि प्रा. विशाल गायकवाड यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक आरती पार पडली. यामध्ये नगरसेवक सुरेश नेमाडे, योगेश पाटील, संदीप साबणे, महावीर कटारिया, दिनेश गायकवाड, सुकलाल राजपूत, मदनसिंग राजपूत, दीपक कदम आणि अप्पासाहेब हिवाळे यांनी आरतीचा लाभ घेतला. प्रारंभी कार्यक्रमाच्या आयोजिका सुवर्णा जाधव आणि नगराध्यक्ष संजय जाधव यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले. दरम्यान, पुढील काही दिवस नवरात्रोत्सवानिमित्त गंगापूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पालकांनी मुलांवर बालपणापासूनच धार्मिक, सांस्कृतिक संस्कार करणे गरजेचे आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात युवा पिढी भरकटत चालल्याबद्दल पलक किशोरी यांनी चिंता व्यक्त केली. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या मुलांवर बालपणापासूनच धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक संस्कार करणे गरजेचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. केवळ भौतिक संपत्ती कमावून चालत नाही, तर घरात संस्कारांची पुंजी असणे हेच सर्वात मोठे धन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, असे धार्मिक उत्सव केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता समाजात सलोखा, एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहेत.
Source link
आयुष्यामधील प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणासाठी द्यावा- पलक किशोरी:दुसऱ्या दिवशी हजारो महिला भाविकांची उपस्थिती