![]()
पंढरीत दुसऱ्या स्वरमालेत देवश्री दंडवते यांनी राग भूपमधील सादरीकरणातून शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी दिली. त्यानंतर ‘जय दुर्गे भवानी’, ‘नाचत गुरुभजनी’, ‘मी गातो नाचतो’, ‘कृष्ण देखिला’ आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ अशा भक्तिरचनांनी रसिकांची मने जिंकली
.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवातील दुसरी स्वरमाळ बुधवारी भक्तिमय वातावरणात रंगली. देवश्री दंडवते यांच्या दमदार शास्त्रीय गायनाने आणि ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या दैवी, सुरेल स्वरांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या स्वरमाळेची सुरुवात व्यवस्थापक प्रवीणकुमार घम आणि मान्यवर कलाकारांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माऊली खरात, ज्ञानेश्वर दुधाणे, माऊली पिसे, सुमंगल टेंगसे आणि ओजस रानडे यांनी सुरेल साथसंगत केली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.
ज्ञानेश्वरींच्या गायनातून आत्मानंदाची अनुभूती दुसऱ्या सत्रात ज्ञानेश्वरी गाडगे हिने राग यमनने गायनाची सुरुवात केली. त्यानंतर ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘जय देवी माता भवानी’, ‘येग येई विठाबाई’,, ‘कृष्णाला भुलवले’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ अशा विविध रचनांचे सुरेल सादरीकरण केले. अखेरीस भैरवीतील ‘लय नाही, लय नाही मागणं’ या रचनेने गायनाची सांगता करत तिने रसिकांना आत्मानंदाची अनुभूती दिली.